निवडणुकीत राजकीय पक्षांतील एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या कमतरतेमुळे राजकीय पक्षांना कार्यालयात आणि प्रचार सभांना गर्दी फुलविण्यासाठी कार्यकर्ते विकत घेण्याची वेळ आली आहे. नाक्यावरील मजूर, बेरोजगार तरुण आणि महिला कार्यकर्त्यांचा भाव वधारला आहे. पाच तासांसाठी दोनशे रुपयांची कमाई होत असल्याने या उसन्या कार्यकर्त्यांची चंगळ झाली आहे. या कार्यकर्त्यांना सर्वच पक्षाकडून मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे हा सर्व राजकीय घोडेबाजार आदर्श आचारसंहितेवर देखरेख करणाऱ्या निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांच्या नजरेखाली सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा ज्वर वाढत आहे. प्रचार कार्यालयाबरोबर घरोघरी मतदारांच्या भेटीगाठींवर अधिक भर दिला जात आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातही अचानक वाढीव कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षांची कार्यालये भरली आहेत. शेवटचे २० दिवस निवडणुकीला राहिल्याने प्रति कार्यकर्त्यांचा दर २०० रुपये, रात्री एकावेळची बिर्याणी अशी त्यांची सोय उमेदवारांकडून करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या गर्दीपासून ते सभेला कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसण्याचे चित्र राजकीय पक्षांना उभारावे लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा बाजार मांडला जात आहे. पुरुष कार्यकर्त्यांसाठी बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवसांमध्ये रात्रीची ओल्या पाटर्य़ाची सोय पुढाऱ्यांनी केल्याचेही पाहायला मिळते. पुरुष कार्यकर्त्यांपेक्षा राजकीय पक्षांनी महिला कार्यकर्त्यांवर अधिक विश्वास दर्शविला आहे. महिलांना पाच तासांचे दोनशे रुपये रोख सायंकाळी प्रचाराचे काम झाल्यानंतर घरी जाताना वाटण्यात येतात. महिला प्रामाणिक असल्याने इतर पक्षांचा प्रचार करणार नाहीत, असा विश्वास उमेदवारांना असल्याने घरोघरीची प्रचार कामे त्यांच्यावर सोपविण्यात आली आहेत. सध्या या महिलांकडे मतदारांच्या याद्या छाणणी करून मतदार केंद्रानुसार मतदारांचे स्लिप घरोघरी वाटण्याचे काम राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये सुरू आहे. त्यामुळे सकाळी पुरुष कार्यकर्त्यांनी आणि दुपारनंतर महिला कार्यकर्त्यांनी प्रचार कार्यालये गजबजलेली पाहायला मिळतात.