भाजपचे ठाणे शहराध्यक्ष व माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना मारहाण तसेच त्यांचे अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा आता ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नौपाडा पोलिसांवर परस्परविरोधी दबाब टाकणाऱ्या राजकीय नेत्यांची कोंडी झाली आहे. तसेच या प्रकारामुळे तणावाखाली असलेल्या नौपाडा पोलिसांचा भार काहीसा हलका झाला आहे.
मिलिंद पाटणकर मारहाणप्रकरणी पोलिसांनी स्वत: गुन्हा दाखल करून कारवाई करावी, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा गट आग्रही होता. या संदर्भात आघाडीच्या नेत्यांनी ठाणे पोलीस आयुक्त के.पी.रघुवंशी यांची भेट घेऊन या विषयी चर्चा केली होती. त्यामुळे शिवसेना-भाजप नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी आघाडी गटाचा पोलिसांवर दबाब वाढू लागला होता, तर महापालिकेतील तोडफोडप्रकरणी नौपाडा पोलिसांनी सुरुवातीला महापालिकेच्या तक्रारीवरून उपमहापौर मुकेश मोकाशी यांच्यासह युतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, ही कारवाई करण्यात येऊ नये, यासाठी युतीच्या नेत्यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडून पोलिसांवर दबाब वाढविला होता. दरम्यान, मिलिंद पाटणकर यांनी ठाण्यात दाखल होताच, नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मारहाण, अपहरण आणि डांबून ठेवल्याप्रकरणी युतीच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्य़ाच्या तपासात राजकीय नेत्यांची लुडबूड होऊ नये आणि आरोपींना अटक व्हावी, यासाठी हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.