कल्याण-डोंबिवली शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, चौक सकाळ ते रात्री उशिरापर्यंत वाहतुकीने गजबलेले असतात. या सततच्या वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिक, व्यावसायिक, चालक हैराण झाले आहेत. रस्ते, चौक तेच पण वाहने दामदुप्पट झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्याचे प्रभावी उपाय खासदार, आमदार, नगरसेवक व पालिका प्रशासन, वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचे चटके बसत आहेत.
कल्याणमधील शिवाजी चौक, सहजानंद चौक, लाल चौकी, महात्मा फुले चौक, वलीपीर रस्ता, दीपक हॉटेल, महालक्ष्मी ते गुरुदेव हॉटेल रस्ते सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत वाहतूक कोंडीने गजबजलेले असतात. गेली काही वर्षे कल्याण शहरात दिवसा अवजड वाहनांना मज्जाव होता. ही वाहने रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत शिळफाटा ते दुर्गाडी किल्ला रस्त्याने ये-जा करीत असत. या वेळेवर वाहतूक पोलिसांचे यापूर्वी कडक नियंत्रण होते. आता कंटेनर, ट्रेलर व सर्व प्रकारची अवजड वाहने दिवसाढवळ्या वाहतूक पोलिसांसमोरून कल्याण शिळफाटा, पत्रीपूल, शिवाजी चौकमार्गे दुर्गाडी पुलावरून भिवंडीच्या दिशेने जातात. ही वाहने शहरातून नेताना एका कोपऱ्यावर वाहतूक पोलीस आणि अवजड ट्रकचा चालक ‘हस्तांदोलन’ करतानाचे चित्र नागरिक पाहत असतात.
कल्याण शहरात भाजीबाजार, घाऊक बाजार असल्याने भिवंडी, शहापूर, मुरबाड, वाडा तालुक्यातील व्यापारी वाहने घेऊन खरेदीसाठी कल्याणमध्ये येतात. नेहमीच्या वाहतूक कोंडीत या वाहनांनी भर पडते. चाकरमानी, एमआयडीसी, उद्योग-व्यावसायिक मंडळी दररोज आपल्या वाहनाने ठाणे, मुंबई, पनवेल, नाशिक दिशेने जातात. शालेय विद्यार्थ्यांच्या बस अशा वाहने कोंडीचा अनोखा संगम दररोज कल्याण-डोंबिवलीत पाहण्यास मिळत आहे.
पुलांची कोंडी
कल्याण पूर्व भागात विठ्ठलवाडी, वालधुनी, शहाड परिसरात पालिकेने उड्डाण पूल उभारले आहेत. हे पूल उभारण्यापूर्वी कोणतेही नियोजन नसल्याने या पुलांचा कोणताही उपयोग नागरिकांना नियमितपणे वाहतुकीसाठी होत नाही, असे कल्याण पूर्व भागातील काही नागरिकांनी सांगितले. काटेमानिवली येथील उड्डाण पूल पालिका अभियंते, नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे गेल्या तीन वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. या पुलाचे नियोजन चुकल्याने पुलाच्या बांधकामात अडथळे आले आहेत. पाणीटंचाई, शाळांच्या विषयावर पोटतिडकीने बोलणारे कैलास शिंदे, सचिन पोटे, नीलेश शिंदे, नितीन निकम व कल्याण पूर्वेतील सर्वपक्षीय नगरसेवक या विषयावर मौन बाळगून असल्याने नागरिक संतप्त आहेत. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या एक किलोमीटर लांबीच्या गोविंदवाडी रस्त्याचे ‘बारसे’ कधी होणार या प्रतीक्षेत नागरिक आहेत.
डोंबिवलीत कोंडी
डोंबिवली पूर्व भागातील फडके चौक, बाजीप्रभू चौक, दत्तनगर चौक, कोपर उड्डाण पूल, गावदेवी मंदिर, मानपाडा, सागाव रस्ता, डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानक भागातील पंडित दीनदयाळ चौक, गुप्ते चौक, महात्मा गांधी चौक, सुभाष चौक रस्ते सकाळपासून वाहतूक कोंडीने गजबजलेले असतात. तुटपुंजे वाहतूक पोलीस या कोंडीवर नियंत्रण आणण्यात कमी पडत आहेत. निवृत्तीला आलेले व शहराची माहिती नसलेले अधिकारी वाहतूक अधिकारी शहरात आणून बसवले जात आहेत. शालेय बस, अवजड सामानाचे ट्रक, त्यात पालिकेची कचरा उचलणारी वाहने या कोंडीत भर घालत आहेत. रेल्वेने स्थानक भागात वाहनतळ सुरू करूनही नागरिक तेथे पैसे द्यावे लागतात म्हणून रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी करून कोंडीत भर घालीत आहेत.
टिटवाळा गजबजलेला
टिटवाळा रेल्वे स्थानक परिसर ते गणपती मंदिर दरम्यान रिक्षा, वाहनांची सतत ये-जा सुरू असते. टिटवाळा बाजारपेठेत रस्ते कमी आणि वाहने जास्त असे चित्र दररोज दिसते. टिटवाळा भागात दर्शनासाठी येणारे भाविक त्याचबरोबर या भागात मोठय़ा प्रमाणात लॉज संस्कृती विकसित होत आहे. त्यामुळे सकाळपासून तरुण, तरुणींची या भागात वर्दळ असते. झटपट प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षा चालक आडव्या तिडव्या रिक्षा उभ्या करून वाहतुकीत अडथळे आणीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस कोंडीविषयी सुस्त असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.