संशोधन करण्याची इच्छा नसतानाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) आग्रहास्तव पीएच.डी. करणाऱ्यांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला असून गेल्या १४ वर्षांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तब्बल ४ हजार, २१६ जणांना आचार्य पदवी बहाल करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या निवडणुकाचे वर्ष वगळता पीएच.डी. करणाऱ्यांची संख्या चढत्या क्रमाने आहे. तसेच गेल्यावर्षीचा २०१३ चा अपवाद वगळता दरवर्षी नित्यनेमाने पदवीप्रदान समारंभ पार पडून त्यात पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक पदवी प्रदान करण्यात आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार अ‍ॅकेडमिक परफॉर्मन्स इंडेक्स (एपीआय) वाढविण्यासाठी प्राध्यापक पीएच.डी. करतात, हेही आता लपून राहिलेले नाही. प्राध्यापकांच्या निवडीसाठी, नेट/सेटमध्ये सूट मिळण्यासाठी, पदोन्नतीसाठी पीएच.डी. उपयोगी पडते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत पीएच.डी.चे महत्त्व वाढल्याने जो तो पीएच.डी. करीत सुटला आहे. आचार्य पदवीधारकांची संख्या दरवर्षी शेकडोने वाढत असून गेल्या १४ वर्षांत तब्बल ४ हजार, २१६ विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आचार्य पदवीने सन्मानित केले आहे. तसेच यावर्षीचा १०१ वा पदवीप्रदान समारंभही येऊ घातला असून त्यातही मोठय़ा संख्येने आचार्य पदवी प्राप्त करणारे आहेत. अनेकदा शोधप्रबंधांवरचे शीर्षक बदलेले असते. मात्र, आतील मजकूर सारखाच असल्याचीही अनेक उदाहरणे असतात व विद्यापीठ वर्तुळात नेहमीच अशा गोष्टींची चर्चा होत असते. पीएच.डी. करण्याच्या हव्यासापोटी विद्यापीठातील पीएच.डी. कक्ष गेल्या काही वर्षांमध्ये चर्चेत आला असून येथील लिपीक आणि अधिकाऱ्यांच्या अवतीभवती हे पीएच.डी.चे शोधनिबंध पसरलेले आहेत.
कला, सामाजिक विज्ञान, विज्ञान, वाणिज्य, गृहविज्ञान, शिक्षण, विधि, वैद्यक, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि आयुर्वेद अशा दहा विद्याशाखांमध्ये नागपूर विद्यापीठात पीएच.डी. करता येते. सर्वात कमी पीएच.डी. आयुर्वेद विद्याशाखेत पाहावयास मिळतात तर कला, विज्ञान, वाणिज्य या पारंपरिक विद्याशाखांबरोबर सामाजिक विज्ञान विद्याशाखेत मोठय़ा संख्येने पीएच.डी. करणारे आहेत. विधि विद्याशाखेत पीएच.डी.साठी उपयोगात येणारे नियम आजही काटेकोरपणे पाळले जातात.
25