कल्याण डोंबिवली परिसराला नोकरी, व्यवसायाच्या संधी देणारा डोंबिवलीतील औद्योगिक विभाग बंद पाडून तेथे निवासी विभाग सुरू करण्याच्या जोरदार हालचाली काही धनदांडग्या विकासकांकडून सुरू असल्याची धक्कादायक हाती आली आहे.
डोंबिवलीतील मानपाडा रस्ता, सोनारपाडा, सागाव, चोळेगाव, खंबाळपाडा परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीत सुमारे ३५० लहानमोठय़ा कंपन्या आहेत. शेकडो कामगार या कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. बंद पडलेल्या काही कंपन्या नव्याने उभारी घेऊन, त्या जागी नवीन उद्योजक येऊन त्या नव्या दमाने पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत रोजगाराचे साधन असलेला हा विभाग चालू राहणे आवश्यक आहे. ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसर औद्योगिक पट्टा तेथील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे अलीकडे निवासी होऊन धनाढय़ विकासकांच्या घशात गेला आहे.
त्यामुळे ठाण्यात कंपन्यांच्या जागेवर टोलेजंग इमारती उभ्या राहत असल्याचे चित्र दिसत आहे. तसाच प्रयत्न डोंबिवलीतही सुरू आहे. काही खासगी कंपन्या परस्पर विकासकांशी व्यवहार करून जमिनी विकून टाकत आहेत. स्थानिक भूमिपुत्रांनी डोंबिवली परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून पन्नास वर्षांपूर्वी एमआयडीसीला कवडीमोलाने जमिनी दिल्या. त्या जमिनी आता कंपनी मालक पैशाच्या हव्यासाने विकत असतील तर ही स्थानिकांची प्रतारणा ठरणार आहे. दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून डोंबिवली एमआयडीसी परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रदूषणाच्या नावाखाली कंपन्या बंद करण्याची जोरदार मागणी काही स्वयंसेवी संस्था, नागरिकांकडून होत आहे. काही कंपन्या हेतुपुरस्सर प्रदूषण करून औद्योगिक विभाग बंद पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत का, अशाही शंका काही सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.  
डोंबिवलीतील औद्योगिक विभाग बंद करण्याच्या धनदांडग्यांच्या या कटास प्रखर विरोध करण्याचा इशारा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. कल्याण डोंबिवली परिसराचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. वाढत्या लोकसंख्येला रोजगार मिळण्यासाठी स्थानिक भागात एमआयडीसी हे एकमेव साधन आहे. त्यामुळे औद्योगिक विभाग कायम राहण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.