शहरातील विविध भागातील बाजारात भाजी किंवा कुठलीही वस्तू खरेदी केल्यानंतर दुकानदारांकडे प्लास्टिकच्या पिशव्या मागणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. प्लास्टिक पिशव्याच्या संदर्भात समाजात महापालिकेतर्फे अनेकदा जनजागृती करण्यात आली, मात्र त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही. शहरात भाजीविक्रेत्यांपासून मोठय़ा शॉपिंग मॉल्समध्ये प्लास्टिक पिशव्याचा खुलेआम वापर होत आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर तसेच त्याचा साठा करून ठेवून विक्री करण्यावर बंदी घातलेली असताना मोठय़ा प्रमाणात अशा प्लास्टिक पिशव्याचा उपयोग होत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या लक्षात येताच त्यांनी शहरातील विविध भागात कारवाई करून ६५६ किलो, २५० ग्राम प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून ४७ हजार ५०० दंड वसूल करून दीडशे छोटय़ा दुकानदारांना नोटीस देण्यात आली आहे.  
शहरातील दुकाने व भाजीविक्रेते यांच्याकडून दररोज घेतल्या जाणाऱ्या पिशव्यांचे प्रमाण तीस ते दीडशे एवढे आहे. एका दुकानातून दररोज एवढय़ा प्लास्टिकच्या पिशव्या घेतल्या जात असतील तर अख्ख्या नागपूर शहरातून घेतल्या जाणाऱ्या पिशव्यांचे प्रमाण किती असेल याची कल्पनाच केलेली बरी. ‘प्लास्टिकची पिशवी मागू नका’ अशी पाटी लिहिलेल्या दुकानातही दुकानदार पिशव्या ठेवतात. ज्या ग्राहकांकडे पिशव्या नसतात त्यांना आम्ही देतो. नाहीतर ते माल घेतच नाहीत. आमचाही नाईलाज आहे, असे दुकानदारांचे म्हणणे असते. घरून निघताना कापडी पिशवी घ्यायला विसरलो हे कारण ग्राहक सांगतो. आपली आजी किंवा पणजी त्याकाळी बाजारात भाजी आणयला जात होत्या ना? तेव्हा त्या कापडी पिशवीच नेत असत. मग आपण एक छोटी पिशवी जवळ बाळगायला काय हरकत आहे? महाराजबाग, अंबाझरी, फुटाळा तलाव, सोनेगाव तलाव, बालोद्यान या ठिकाणी तर लोकांच्या निष्काळजीपणाचा कहर झाला आहे. उद्यानात येणारे प्लास्टिकच्या पिशव्या सोडून निघून जातात. यावर उपाय म्हणून महापालिकेने कचरा कुंडी ठेवली होती, मात्र त्याचा उपयोग नागरिक करीत नसून रस्त्यावर या पिशव्या फेकून दिल्या जात आहेत. त्याचा परिणाम आपल्यावर तर होतोच पण पाळीव प्राणी, वन्यजीवांचे अतोनात नुकसान होते.
पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साठू लागले की, आपण शासन व प्रशासनावर टीका करतो. पण सामान्य नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यात आपण दुर्लक्ष करीत असतो. मध्यंतरी प्लास्टिकच्या वापरावर सरकारने बंदी घातली होती. आपल्यापैकी कितीजणांनी ती पाळण्याचा प्रयत्न केला. काही दिवस या बंदीला प्रतिसाद दिला, पण तो काही फार काळ टिकला नाही. ८० ते ९० टक्के लोकांनी पिशव्या घेणे बंद केले तरीही याचा पर्यावरणाला हातभार लागेल. मॉल्स, बाजारपेठा, भाजीबाजार, उद्यान, पर्यटनाची ठिकाणे, विद्यापीठ परिसर आदी ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन प्लास्टिक बंदी करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा येत्या पावसाळ्यात हा प्लास्टिकचा भस्मासूर नागरिकांचे जीवित धोक्यात आणल्याशिवाय राहणार
नाही.
या संदर्भात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर यांनी सांगितले, प्लास्टीक पिशव्यावर यापूर्वी अनेकदा बंदी घालून कारवाई करण्यात आली. साधारणत: दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन अधिकारी कारवाई करीत असतात. शहरातील जयताळा, सीताबर्डी, नंदनवन, बिग बाजार, सदर, गांधीबाग, चिखली ले आऊट, सक्करदरा या भागातील ५०० पेक्षा अधिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून ही मोहीम सुरू ठेवणार असल्याचे डॉ. गणवीर यांनी
सांगितले.