वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्मचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना ठाणे व मुंबईत कठोर कारवाई आणि मनस्तापाला सामोरे जावे लागू नये, याकरिता ठाणे ग्रामीण पोलिसांनी ‘ठाण्याचे प्रवेशव्दार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसारा घाटात एक अभिनव मोहीम हाती घेतली आहे. अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करताना काचांवरील ‘काळ्या फिल्म्स’ काढून टाकण्यात येत आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून ठाणे व मुंबईला जाणाऱ्या जवळपास तीन हजार ३०० वाहनांवर आतापर्यंत अशी कारवाई करण्यात आली आहे. काळ्या फिल्म्स काढून टाकल्याने वाहनधारकांना पुढील प्रवास निर्धोकपणे करण्याचा मार्ग खुला होत असल्याचा दावा ठाणे पोलिसांनी केला आहे.
वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पाश्र्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही वाहनाच्या काचेवर काळ्या फिल्म्स् बसविण्यास प्रतिबंध केला आहे. काळ्या काचांमुळे वाहनातून नेमके कोण प्रवास करीत आहे ते लक्षात येत नाही. त्यामुळे ज्या वाहनांच्या काचांवर या फिल्म्सचा वापर झाला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत. या अनुषंगाने राज्यात कमी-अधिक प्रमाणात कारवाई होत असली तरी देशाची आर्थिक राजधानी व त्यालगतच्या ठाणे जिल्ह्यात तिचे स्वरूप अधिक कठोर आहे. मुंबई व ठाण्यातील स्थानिक वाहनधारकांना ही बाब ज्ञात असली तरी विविध कामांनिमित्त मुंबईत दाखल होणाऱ्या बाहेरगावातील वाहनधारकांना याची कल्पना नसते. परिणामी, उपरोक्त ठिकाणी वाहनधारकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. ठिकठिकाणी असे वाहन अडविले जाण्याची शक्यता असते. दंड भरूनही काचांवरील फिल्म्स कुढे काढता येईल याची माहिती नसते. यामुळे वाहनधारकांना मनस्तापही सहन करावा लागतो. हे लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलिसांनी मुंबईत प्रवेश करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील प्रवेश ठिकाणांवर वाहनधारकांना सजग करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन अर्थात मुंबई-आग्रा महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.