डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन ४० दिवस लोटले, तरी पोलीस मारेकऱ्यांचा शोध लावू शकले नाहीत. त्यामुळे तरुणांनी वेगवेगळ्या माध्यमांतून सरकारवर या बाबत दबाव आणावा, असे आवाहन करून पुढारी फक्त मतांचे राजकारण करीत असल्याचा आरोप डॉ. हमीद दाभोलकर यांनी केला.
येथील बलभीम महाविद्यालयात विवेकी युवा निर्धार परिषदेत डॉ. हमीद दाभोलकर बोलत होते. माजी आमदार उषा दराडे, प्रा. सविता शेटे, सुनील क्षीरसागर यांच्यासह अंनिसचे कार्यकत्रे उपस्थित होते. डॉ. हमीद म्हणाले, डॉ. दाभोलकर यांची हत्या होऊन ४० दिवस झाले. मात्र, सरकार मारेकऱ्यांचा शोधू घेऊ शकले नाही. ४० वर्षांच्या काळात दाभोलकरांनी समाजात विचार पेरण्याचे काम केले. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी १८ वष्रे संघर्ष केला. अशा विचारी माणसाची हत्या ही समाजाची मोठी शोकांतिका आहे. पण माणूस गेला तरी त्याचे विचार जात नाहीत, असे सांगून मारेकऱ्यांच्या शोधासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी, या साठी तरुणांनी वेगवेगळया माध्यमांतून सरकारवर दबाव आणावा. सरकार या हत्येचे राजकारण करीत असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. या वेळी विद्यार्थी व कार्यकत्रे मोठया संख्येने उपस्थित होते.