राज्यातील मान्सूनच्या वाटचालीत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील मान्सूनचे आगमन लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. या पाश्र्वभूमीवर तीन दिवसांच्या खंडानंतर अकोले शहर आणि परिसरासह तालुक्यात अनेक ठिकाणी आज मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने पुन्हा हजेरी लावली असून तेथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.
जूनच्या प्रारंभीच दोन तीन दिवस तालुक्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्या कालावधीत तालुक्यात चांगले पावसाळी वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे मृगाच्या सुरुवातीलाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून दाखल होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र कोकण किनारपट्टीवरील मान्सूनचा प्रवास रेंगाळल्यामुळे  तालुक्यातील निर्माण झालेले पावसाळी वातावरण निवळले. मागील तीन दिवस कोठेही पाऊस पडला नाही. मात्र तीन दिवसाच्या खंडानंतर आज अकोले शहर आणि परिसरासह तालुक्याच्या पूर्व भागात पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या. आढळेच्या पाणलोट क्षेत्रातही सुमारे तासभर चांगला पाऊस पडला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मात्र कळसुबाई, हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगात पुन्हा गहीरे पावसाळी वातावरण निर्माण झाले असून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.