नटवर्य प्रभाकर पणशीकर एकांकिका स्पर्धा

ठाणे रोटरीच्या वतीने प्रथमच घेण्यात आलेल्या नटवर्य प्रभाकर पणशीकर खुल्या एकांकिका स्पर्धेत ‘कुणाचे कुणावाचून अडे’, ‘नटरंग्या’, ‘सद्रक्षणाय’ अशा तीन एकांकिका सवरेत्कृष्ट ठरल्या. मुंबई आणि ठाणे परिसरापुरत्या घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून सुमारे ५० एकांकिका प्राथमिक फेरीसाठी आल्या होत्या. या स्पर्धेसाठी  ‘टोपीखाली दडलंय काय’ हा विषय ठरविण्यात आला होता. अंतिम फेरीत नटरंग कल्याण संस्थेची ‘नटरंग्या’, आकृती ग्रुपची ‘प्रेम’, सचिवालय जिमखान्याची ‘सद्रक्षणाय’, केईएम रुग्णालयाची ‘कुणाचे कुणावाचून अडे’,  अनिल लोंढे लिखित व दिग्दर्शित ‘देणाऱ्याने देत जावे’ अशा पाच एकांकिकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली होती.
उत्तेजनार्थ एकांकिकेचे पारितोषिक ‘प्रेम’ आणि ‘देणाऱ्याने देत जावे’ या एकांकिकांनी मिळविले. सवरेत्कृष्ट लेखक पारितोषिक प्रसाद दाणी यांना ‘नटरंग्या’साठी तर डॉ. पंतवैद्य यांना ‘कुणाचे कुणावाचून अडे’साठी देण्यात आले. डॉ. हिमालय पंतवैद्य, हरेश मयेकर, संदेश गायकवाड हे कलावंत उत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचे मानकरी ठरले. तर उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अनघा पटवर्धन, अंजली बापट, मधुरा जाधव यांना गौरविण्यात आले. सहाय्यक अभिनेता पारितोषिक डॉ. गोपाल धडफळे यांना तर सहाय्यक अभिनेत्री पारितोषिक अंजली मातोंडकर यांना मिळाले. ‘कुणाचे कुणावाचून अडे’ या एकांकिकेचे नेपथ्य सवरेत्कृष्ट ठरले तर संगीताचे पारितोषिक ‘सद्रक्षणाय’ या एकांकिकेची निवड करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अशोक समेळ, अनिल खोपकर यांनी काम पाहिले. यावर्षीपासून ठाणे रोटरीतर्फे भरविण्यात आलेली नटवर्य प्रभाकर पणशीकर एकांकिका स्पर्धा दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आयोजित केली जाणार असून राज्यभरात विजेत्या एकांकिकांचे प्रयोग करून अधिक व्यापक पातळीवर नाटय़वेडय़ा मराठी रसिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.