वेकोलिने खाणींच्या सुरक्षेसाठी बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. या दिशेने भरीव कामगिरी करण्याची गरज आहे. पुढील काळात वेकोलिला मशिन ऑपरेटर्सना प्रशिक्षण, नवीन तंत्रज्ञानाने परिपूर्ण उपकरणांची खरेदी यासह खाणींच्या सुरक्षेबाबत कर्मचारी आणि व्यवस्थापनाला जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागणार आहे. सुरक्षा ही सर्वाची जबाबदारी आहे. खाण दुर्घटना कमी करण्यास अधिक प्राधान्य देण्यात आल्याचे खाण सुरक्षा पश्चिम क्षेत्राचे उप महासंचालक अनुप विश्वास यांनी सांगितले.
वेकोलिच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ४३ व्या त्रिपक्षीय सुरक्षा समितीच्या बैठकीत  अनुप विश्वास बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश होते. वेकोलिमध्ये एलईडी कॅप लॅम्प्स, भूमिगत खाणींमध्ये मॅन राईडिंग सिस्टिम, दक्षता विभाग आणि केलेल्या उपाययोजनांची माहिती ओम प्रकाश यांनी दिली. बैठकीला वेकोलिचे कार्मिक संचालक रूपक दयाल, तांत्रिक संचालक एस.एस. मल्ही, नागेश्वर राव, खाण सुरक्षा संचालक पी. कुमार, एम. सहाय, एम. अरुमुगम, एस.क्यू. जमा, ताजुद्दीन, रशीद, ए.पी. सिंह, सुनील मोहितकर, गोपाल कृष्णन आदी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी खाण सुरक्षाबाबत बैठकीत सूचना केल्या. योजना विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक आर.सी. सनौडिया यांनी आभार मानले.