‘केल्याने होत आहे.. आधी केलेचि पाहिजे’ ही उक्ती सार्थ ठरवत नांदेड कारागृहातल्या कैद्यांनी परिसरात सुमारे एक एकर पडीक जमिनीवर भाजीपाल्याचा सुंदर मळा फुलवला. कारागृहाचे प्रमुख दिलीप वासनिक यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाने सरकारच्या पैशांची तर बचत होत आहेच, शिवाय स्वकष्टाने पिकवलेल्या ताज्या भाजीचा आस्वादही कैद्यांना घेता येत आहे.
नांदेड शहराच्या मध्यवर्ती वस्तीत जुने कारागृह आहे. १३५ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात आजमितीस तब्बल ३४३ कैदी आहेत. क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी असूनही त्यांची गैरसोय होणार नाही, या साठी कारागृहाचे अधीक्षक दिलीप वासनिक यांनी खास दक्षता घेतली. सरकारी अधिकाऱ्यांचा कोडगेपणा अनेकांनी अनुभवला. पण एक कठोर, शिस्तप्रिय अधिकारी किती संवेदनशील व दूरदृष्टीचा असतो, हे वासनिक यांच्या रूपाने पाहावयास मिळते.
नांदेडचे कारागृह कच्च्या कैद्यांसाठी आहे. ज्यांच्यावर वेगवेगळ्या गुन्ह्य़ांत दोषारोपपत्र असून जे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, अशांना या कारागृहात ठेवले जाते. नांदेडच्या कारागृहाला संपूर्ण संरक्षण भिंत आहे. याच आवारात गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे एक एकर पडीक जमीन होती. नांदेडची सूत्रे घेतल्यानंतर कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी, या साठी वासनिक यांनी वाचन संस्कृतीची सवय कैद्यांना लावली. योग, प्राणायाम, वाचन या बाबी सुरू झाल्यानंतर त्यांनी पडीक जमिनीचा वापर करण्याचा मनोदय कैद्यांपुढे ठेवला. सर्वच कैद्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. गेल्या दोन महिन्यांपासून या एक एकर जमिनीवर पानकोबी, फुलकोबी, वांगे, टोमॅटो, पालक, लसूण, कांदे आदींचे उत्पादन घेतले जाते.
कैद्यांच्या संख्येनुसार रोज २० ते २५ किलो भाजीपाला खरेदी करावा लागत होता. शिवाय कैद्यांना भाजीपाला पुरवायचा म्हणून संबंधित कंत्राटदारही सुमार दर्जाचा भाजीपाला देत होते.
आजमितीस कारागृहातील कैद्यांना आवश्यक लागणाऱ्या भाज्यांचे उत्पादन येथेच होत आहे. त्यामुळे भाजीपाला विकत घेऊन त्यावर होणाऱ्या खर्चाची बचत होत आहे. काही भाज्या विकत आणाव्या लागतात, पण त्याचे प्रमाण आता अत्यल्प राहिल्याचे वासनिक यांनी सांगितले. मार्चपर्यंत साधारणत: एक लाख रुपयांची बचत होईल, अशी माहिती त्यांनी दिली. कैद्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानेच हा मळा फुलल्याचे त्यांनी सांगितले.