जमिनीखालील जीर्ण झालेल्या जलवाहिन्या आणि मलनिस:रण वाहिन्यांमुळे मुंबईच्या रस्त्यांना धोका निर्माण होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांत नियमितपणे ठरावीक अंतराने रस्ते खचण्याच्या घटना घडत आहेत. मात्र जमिनीखालील वाहिन्यांच्या जाळ्याचे नकाशेच पालिकेकडे नसल्याने यावर तोडगा काढणे अवघड बनले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती सुरू असून त्यासोबत गळतीची शोधमोहीम हाती घेतल्यास एकाच खोदकामात दोन्ही कामे उरकता आली असती. परंतु वेगवेगळ्या कामांसाठी एकाच ठिकाणी वारंवार खोदकाम करून पैशांची उधळपट्टी करण्याची सवय पालिका प्रशासन आणि शिवसेना-भाजप युतीलाही जडलेली आहे.
शहरामधील ब्रिटिशकालीन जलवाहिन्या आता पुरत्या जीर्ण झाल्या आहेत. त्यातून गळणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याखालील भाग भुसभुशीत होत जातो आणि रस्ता खचतो. त्याचबरोबरीने जीर्ण जलवाहिन्यांमध्ये मलवाहिन्यांमधील घाणेरडे पाणी जाऊन पिण्याचे पाणी दूषित होण्याचाही धोका असतो. त्यामुळे जीर्ण जलवाहिन्या बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. तसेच काही भागांमध्ये जलबोगद्यांची निर्मिती करून हा प्रश्न कायमचा निकालात काढण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. मात्र जलवाहिन्या बदलण्याच्या कामातील संथगती रस्त्यांसाठी धोकादायक ठरू लागली आहे.
यापूर्वी कुलाबा, गिरगाव, पेडर रोड, दादर टीटी, वरळी आदी ठिकाणी रस्ता खचून खड्डा पडल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी काळाचौकी येथे तर सुमारे १० फूट खोल रस्ता खचला होता. पालिकेचे रस्त्यांवर लक्षच नसल्यामुळे या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. रस्ता कधी एकदम खचत नाही. ही प्रक्रिया हळूहळू सुरू असते. सपाट रस्ता हळूहळू ओबडधोबड बनू लागतो. ठरावीक ठिकाणी रस्त्याची पातळी अधिकच खाली जाऊ लागते. पालिकेचे कंत्राटदार त्यावर डांबर टाकून मलमपट्टीचा प्रयत्न करतात. मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. वास्तविक रस्ता ओबडधोबड होऊ लागताच तो संपूर्ण खोदून त्याची दुरुस्ती करण्याची गरज असते.
काही वर्षांपूर्वी प्रार्थनासमाज येथे अचानक रस्ता खचला होता. बेस्टची बस उभी राहील इतका मोठा खड्डा पडल्याने पालिका कर्मचारीही चक्रावले होते. जलवाहिनीतील गळतीमुळे रस्त्याखाली पोकळी निर्माण होऊन रस्ता खचल्याचे कारण तोंडावर फेकून पालिका पालिका अधिकारी मोकळे झाले. अंधेरीमधील सुभाषनगर नाल्यावरील ५३ फूट लांबीचा रस्ता अचानक खचला आणि तेथे २० फूट खोल खड्डा पडला होता. पालिकेच्या कंत्राटदाराने निकृष्ट कामामुळे ही घटना घडल्याचे उजेडात आले होते. आजतागायत मुंबईत रस्ता खचण्याच्या अनेक घटना घडल्या. पण त्यापासून पालिकेने अद्यापही धडा घेतलेला नाही. सध्या महापालिकेने मोठय़ा प्रमाणावर डांबरी आणि सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची दुरुस्ती हाती घेतली आहे. ही दुरुस्ती करताना जीर्ण जलवाहिन्यांतून होणाऱ्या गळतीचाही शोध घेण्याची संधी आहे. मात्र वरवर रस्ता खरवडून त्याची दुरुस्ती करण्यातच कंत्राटदारांना रस आहे. दुरुस्तीसाठी रस्ते खोदताना गळतीचाही शोध घेतल्यास पालिकेला एकाच दगडात दोन पक्षी मारता येतील आणि भविष्यात रस्ते खचण्याचा धोकाही टळेल. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

चौपाटीवरील रस्ता खचला
गिरगाव चौपाटीवरील विल्सन महाविद्यालयासमोर नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावर सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक खड्डा पडला. पालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले.
विल्सन महाविद्यालयासमोर अचानक १ बाय १.५ फूट आणि तीन फूट खोल पडला. हे वृत्त समजताच पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले. रस्त्याखाली पोकळी निर्माण झाल्यामुळे हा खड्डा पडल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. रस्त्याखाली नेमकी कोणत्या कारणाने पोकळी निर्माण झाली हे मात्र समजू शकलेले नाही. या मार्गाखालून मलनिस्सारण वाहिन्या समुद्रात जातात. तसेच जलवाहिन्यांचे जाळेही या मार्गाखाली आहे. यातील एखादी वाहिनी फुटली असावी आणि त्यातून गळती होऊन पोकळी निर्माण झाल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.