राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होऊन जेमतेम एक दिवस उलटत नाही तोच गोंधळाला सुरुवात झाली आहे. विद्यापीठाने एकूण १२६ केंद्रांवर परीक्षा सुरू केल्या असून त्यापैकी बहुतेक परीक्षा केंद्रांची डोकेदुखी वाढत आहे.
बुधवारी एम.ए. मराठी भाग दोनचा पेपर असताना धरमपेठेतील आर.एस. मुंडले महाविद्यालयातील केंद्रावर एकाच आसन क्रमांकाचे दोन विद्यार्थी उपस्थित असल्याने गोंधळ उडाला. सुनीता वसंतराव देवघरे आणि सुनील रामराव अखंडे या दोन विद्यार्थ्यांचा आसन क्रमांक ४७२४५० असा सारखाच आला. खबरदारीचा उपाय म्हणून सुनीलला ‘४७२४५०अ’ असा क्रमांक देऊन परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली.
परीक्षा विभागाकडे परीक्षेच्या दोन दिवस अगोदर परीक्षा केंद्रावर आवश्यक असलेले प्रवेश पत्र उपलब्ध झाले. मात्र, संलग्नित ८२९ महाविद्यालयांपैकी वादग्रस्त २४९ महाविद्यालये सोडल्यास इतर सर्व जिल्ह्य़ांमधील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश पत्रे पोहोचविणे साधी गोष्ट नव्हती. विद्यापीठाच्या विभागांमध्येच गोंधळ उडाला असताना गडचिरोली व गोंदिया येथील महाविद्यालयांमध्येही गोंधळ निर्माण झाला. मानव्यशास्त्र इमारतीच्या प्रमुख आणि पदव्युत्तर हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. शुभा जोहरी यांनी एका दिवसात तेथील सर्व पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्रांचे वाटप केले. हिंदी, मराठी, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, इंग्रजी, राज्यशास्त्र इत्यादी विषयाच्या विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून सोमवारी प्रवेश पत्रे मिळवून मंगळवारी परीक्षा दिली. एलआयटी परिसरातील परीक्षा विभागात विद्यार्थ्यांच्या रांगा होत्या. ज्यांना प्रवेश पत्रे मिळाली नाहीत त्यांना तात्पुरते(प्रोव्हिजनल) प्रवेश पत्रे देण्यात आली. सुनील अखंडे यालाही तात्पुरते प्रवेश पत्र मिळाले. दोघांनाही आसन क्रमांक एकच कसा आला, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला. कारण प्रवेश पत्रावरील क्रमांकाची परीक्षा विभागात नोंद होत असते. तसेच परीक्षेचे अर्ज भरतानाच त्याच्याबरोबर एक अटेंडन्स स्लिपही जोडलेली असते. ती स्लिप परीक्षा विभागाकडे असते. परीक्षा अर्जाबरोबर दोन छायाचित्रे दिली जातात. त्यात एक छायाचित्र प्रवेश पत्रावर आणि एक अटेंडन्स स्लिपवर असते. परीक्षा केंद्रात प्रवेश आणि परीक्षा देण्याची संधी प्रवेश पत्रामुळे मिळते तर परीक्षार्थी विद्यार्थी नक्की कोण हे ओळखण्यासाठी अटेंडन्स स्लिपचा उपयोग परीक्षक करतो. मात्र, अटेंडन्स स्लिप विद्यापीठ परीक्षा केंद्रावर, आर.एस. मुंडले परीक्षा केंद्रावर ऐनवेळी पाठविण्यात आल्याने केंद्राची आणि विद्यार्थ्यांची धांदल उडाली. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातून दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांला परीक्षेला बसू देण्याच्या सूचना मिळत असल्याने केंद्र प्रमुख आणि त्यांचे सहकारी त्रस्त झाले होते.
अटेंडन्स स्लिप ऐनवेळी केंद्रावर आल्या तेव्हा विद्यार्थ्यांनाच नाव, पत्ता, आसन क्रमांक, विषयाचे नाव लिहिण्यास सांगितले. अटेंडन्स स्लिपवर लावण्यासाठी छायाचित्रेही मागितली गेली. परीक्षेला आलेला विद्यार्थी छायाचित्र कशाला जवळ बाळगेल म्हणून काही विद्यार्थ्यांनी छायाचित्रे लावली तर काहींकडे ती नव्हतीच. अनेकांचे आसनक्रमांकच सापडत नसल्याने खोली क्रमांक १०६ अशी स्वतंत्र तरतूद केंद्राने केली होती. त्यामुळे परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांचा वेळ १५ मिनिटे ते अर्धा तास वेळ वाया गेल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तसेच या गडबडीत परीक्षा देणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.