अंदाजे १०० वर्षांपूर्वीची सीताबर्डीवरील महाजन चाळवासियांनी एकत्र येऊन स्नेहमीलन सोहळा येत्या १२ नोव्हेंबरला आयोजित केला आहे. सध्या व्यापारी पेठ असलेल्या पण, त्या काळी ५० ते ६० निवासी घरे असलेल्या या चाळीतील कुटुंबे आता जगभर विखुरलेली आहेत. ‘बटाटय़ाची चाळ’ स्फुरण्याआधी पु.ल. देशपांडे यांनी महाजन चाळीत अल्पकाळ का होईना वास्तव्य केले आहे. सध्या महाजन मार्केट नावाने हा भाग प्रचलित आहे. जगभर विखुरलेल्या कुटुंबांना पुन्हा एकत्र येण्याची हौस असून स्नेहमीलनाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे एक चाळकरी सुनील डेग्वेकर यांनी सांगितले. तसेच ठिकठिकाणी विखुरलेल्या चाळकरांनी स्नेहमीलनाला उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही याच चाळीत राहत होते. येत्या १२ नोव्हेंबरला मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता सायंटिफिक सोसायटीच्या, लक्ष्मीनगरातील सोसायटीच्या हिरवळीवर भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे स्नेहमीलन रंगणार आहे. त्यांच्या हस्ते ७५ पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. स्नेहमीलनाचे औचित्य साधून एक स्मरणिका या कार्यक्रमानंतर काढण्यात येणार आहे. कार्यक्रमातील सहभागीदारांचे अनुभव त्यात यावेत, अशी इच्छा स्वत: मोहन भागवत यांनी व्यक्त केली होती. यावेळी ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय सुधीर महाजन खास या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी येतील.
विक्रम सावरकर, शिवकथाकार निनाद बेडेकर, अल्ट्रा टेकमधील भूषण जोशी, चाळीतील कुटुंबापैकी नर्मदा परिक्रमा पहिल्यांदा पूर्ण केलेले आबाजी गोखले, ज्येष्ठ समीक्षक डॉ. आशा सावदेकर आणि हितवादचे ज्येष्ठ संपादक विजय पणशीकर आदी महाजनचाळवासी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी सुरेश घुगरे, स्मिता उल्हास केळकर, चंद्रकांत लेले आणि समीर देशपांडे आदी उपस्थित होते.