News Flash

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या पूर्तीसाठी कालबध्द कार्यक्रम

सुधारीत प्रशासकीय मान्यतेअभावी नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची रखडलेली सर्व कामे कालबध्द कार्यक्रम आखून यापुढे तातडीने मार्गी लावण्यात

| November 14, 2013 07:32 am

सुधारीत प्रशासकीय मान्यतेअभावी नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची रखडलेली सर्व कामे कालबध्द कार्यक्रम आखून यापुढे तातडीने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिली. नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज मध्यम प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवारी नांदगावनजीक तटकरे यांच्या उपस्थितीत तर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ए. टी. पवार, आ. जयंत जाधव, आ. राजीव देशमुख, आ. पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार, अनिल आहेर, जगन्नाथ धात्रक, नगराध्यक्ष गणेश धात्रक आदी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात यावर्षी पाऊस चांगला झाला असला तरी अनेक मोठ्या प्रकल्पाच्या कामात प्रशासकीय मान्यतेअभावी अडथळे निर्माण झाले आहेत. त्यासाठी जलसंपदा विभाग कालबध्द विकास कार्यक्रम आखत असून त्याला वर्षभरात गती देण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. मनमाड शहरासाठी गुरूत्वाकर्षणाने पाणी कसे उपलब्ध होईल याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच राज्य शासनाने मनमाडच्या पाटोदा समांतर योजनेसाठी लोकवर्गणी माफ करून १०० टक्के अनुदान राज्य शासनाने द्यावे यासाठी भुजबळ यांच्या मदतीने प्रयत्न सुरू असल्याचे तटकरे म्हणाले.
माणिकपुंज धरणामुळे नांदगाव तालुक्यातील २७०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. वर्षभरात आणखी २० कोटी रुपये धरणासाठी निधी उपलब्ध होणार असून पुढील वर्षी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
मनमाडला नव्या पाटोदा योजनेंर्तगत साठवण तलावातील क्षमता चौपट वाढली असून शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था पालिकेने सुधारावी म्हणजे नागरिकांना दिलासा मिळेल तसेच पाणी उचलण्यासाठी लागणाऱ्या वीज बिलाच्या बोज्याखाली नगरपालिका दबली आहे. येथे गुरूत्वाकर्षणाने पाणी आल्यास तो भरुदड वाचेल. त्यासाठी नव्या योजनेचे सर्वेक्षण करणे गरजेचे असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. आ. पंकज भुजबळ यांनी प्रास्ताविकात नांदगाव विधानसभा मतदार संघातील पाणी योजनांसह विविध विकास योजनांचा आढावा घेतला. तसेच माणिकपुंज धरणातील अपूर्ण चाऱ्यांना मंजुरी देवून त्या तातडीने पूर्ण कराव्यात, नाग्यासाक्या धरणाची उंची वाढवावी, माणिकपुंज परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित केला जावा आदी मागण्या केल्या. आ. जयंत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, माणिकपुंज प्रकल्पाची किंमत ५२ कोटी असून १४७० मीटर लांबीचे हे मातीचे धरण आहे. त्याची क्षमता ४९५ दशलक्ष घनफूट असून नांदगाव व चाळीसगांव तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील २७०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2013 7:32 am

Web Title: programme for pending irrigation project
टॅग : Manmad
Next Stories
1 राज्यस्तरीय चर्चासत्रात मानसशास्त्रातील संशोधन पद्धतींवर मंथन
2 राणेंच्या अध्यक्षतेखालील मराठा आरक्षण समितीची बैठक
3 गॅस सिलिंडर नुकसान प्रकरणी ग्राहक अनभिज्ञ
Just Now!
X