गंगाखेड-कोद्री-अंतरवेली राज्यरस्त्याचे मंजूर १० कोटी खर्चाचे काम बंद पडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत १ मे रोजी हे काम सुरू करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले.
या रस्त्यासाठी २ वर्षांपूर्वी १० कोटी रुपये खर्चाच्या निविदा मंजूर झाल्या. त्या वेळी काम सुरू केलेही. परंतु वर्षभरापासून काम बंद पडले. कोद्री-डोंगरजवळा-डोंगरपाटी परिसरात रस्ता खोदून मुरूम भरला आहे. या ठिकाणी पावसाळ्यात ३-३ फुटांचे खड्डे पडले असून दळणवळण थांबले आहे. या रस्त्याने किमान ३५ गावांतील लोकांचे दळणवळण सुरू असते. संत जनाबाई महाविद्यालयाच्या घाट कटिंगमध्ये नेहमीच अपघात होत आहेत. या सर्व प्रकाराविरोधात निवेदन देऊन लक्ष वेधले होते. गुरुवारी आंबेडकर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
या वेळी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उपविभागीय पोलीस अधिकारी गोरे, निरीक्षक शंकर सिटीकर यांनी मध्यस्थी केल्यावर शाखा अभियंता व्यंकटेश मुंढे, उपअभियंता व्ही.जी,पाटील यांनी आंदोलनकर्त्यांसमोर येऊन लेखी निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष बालाजी मुंढे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तालुकाध्यक्ष सदानंद फड, धनंजय भेंडेकर, अमोल देशमुख, शहराध्यक्ष श्याम कुलकर्णी आदी उपस्थित होते.