व्यवस्थापन आणि प्राध्यापक यांच्या वादामुळे सांताक्रूझच्या ‘पब्लिक रात्र महाविद्यालया’तील विद्यार्थ्यांना अंधारात परीक्षा देण्याची वेळ आली. वीजच नसल्याने ग्रंथालयाचा वापरही त्यांना करणे अशक्य झाले.
पदवी महाविद्यालयाच्या पहिल्या सत्राची परीक्षा सुरू झाली असून १७ ऑक्टोबरपासून महाविद्यालयात वीज नव्हती. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी महाविद्यालयात गेले असता मीटर बॉक्समधील फ्यूज काढल्याचे आढळून आले. हा फ्यूज लावल्यानंतर महाविद्यालयात वीज प्रवाह पूर्ववत झाला. या महाविद्यालयात ४५० विद्यार्थी शिकत असून २०० विद्यार्थिनी आहेत.
महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि शिक्षक यांच्यात वाद असून तो विकोपाला गेल्याने हा प्रकार घडल्याचे समजते. वर्षभर प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात आलेले नसल्याचा आरोप प्राचार्य डॉ. स्नेहल दोंदे यांनी केला. सन २००६मध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाविद्यालयाची चौकशी केली होती. यानुसार महाविद्यालयाला सरकारकडून काही रक्कम देय होती, अशी माहितीही त्यांनी दिली. महाविद्यालयाला अनुदान असून सरकारकडून येणारा पगार शिक्षकांपर्यंत पोहचत नसल्याचेही दोंदे यांनी सांगितले.
दरम्यान, महाविद्यालयाच्या कामकाजात काही त्रुटी नसून विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यात आली आहे. पगार देण्याचे काम सरकारचे आहे. सरकार यासाठी टाळाटाळ करत असेल तर आम्ही काही करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष यज्ञनारायण दुबे यांनी दिली. तर अशा प्रकारचे वाद करून विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या या महाविद्यालयाची मान्यता रद्द का होऊ नये अशी मागणी करणारे पत्र आम्ही मंत्र्यांना देणार असल्याचे मनविसेचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी स्पष्ट केले.