सोलापूर शहर व परिसरात वाढत्या उष्म्याने नागरिक अक्षरश: हैराण झाले असून यात एका महिलेचा उष्माघाताने बळी गेल्याची घटना शहरतील सात रस्ता भागात म्युनिसिपल कॉलनीत घडली. शहरात उष्माघाताचा हा दुसरा बळी आहे.
कुरमक्का गोविंद भारसक्या (वय ५७) असे मृत महिलेचे नाव आहे. महापालिकेच्या स्वच्छता कामगारांसाठी बांधलेल्या म्युनिसिपल कॉलनीत कुरमक्का ही राहत होती. दुपारी ती घराबाहेर गेली होती. नंतर घराकडे परत येत असताना घराजवळच रस्त्यावर चक्कर आल्याने ती खाली कोसळली. यात बेशुध्दावस्थेत तिला छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता अखेर तिचा मृत्यू झाला. सदर बझार पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढतच असून गुरुवारी पुन्हा तापमानाचा पारा ४३.५ अंश सेल्सियस इतका मोजला गेला. वाढत्या उष्म्याने नागरिक अक्षरश: हैराण झाले असून त्याचा परिणाम दैनंदिन जीवनमानावर झाल्याचे पाहावयास मिळते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 12:25 pm