भाजप जिल्हाध्यक्षाची निवड
माईकची तोडफोड, खुच्र्याची फेकाफेक, चपलांचा प्रसाद, शिवीगाळ, प्रचंड घोषणाबाजी अशा वातावरणात बुधवारी भाजपच्या नांदेड जिल्हाध्यक्ष व सरचिटणिसांची निवड झाली. अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे संभाजी पवार यांना लादण्यात आल्याने अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
शिस्तीचा राष्ट्रीय पक्ष अशी ओळख असणाऱ्या भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची बुधवारी निवड होणार होती. माजी आमदार विजय गव्हाणे हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. दुपारी २ वाजता प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व आठ मंडळ अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठकीस प्रारंभ झाला. सुरुवातीला नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांचा सत्कार झाल्यानंतर अध्यक्षपदाचे नाव सुचविण्यासाठी श्रावण भिलवंडे यांना बोलविण्यात आले. तरुण, जनाधार असलेल्या श्रावण भिलवंडे यांची अध्यक्षपदी निवड करावी, अशी मागणी नायगाव, नरसी, देगलूर, बिलोली या भागातील कार्यकर्त्यांनी केली होती.
मात्र, अध्यक्षपदाचे नाव सुचविण्यासाठी भिलवंडे यांना बोलविल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले. भिलवंडे यांना दुसऱ्याचे नाव घेण्यास सांगणे म्हणजे त्यांचा पत्ता कट करण्याचा प्रकार समर्थकांच्या लक्षात आल्यानंतर एका कार्यकर्त्यांने तुम्ही अशीच मनमानी करणार आहात का? असा सवाल करत व्यासपीठावरील माईक तोडला. त्यानंतर अन्य समर्थकांनी खुच्र्याची फेकाफेक केली. काही पदाधिकाऱ्यांना चपलांचा प्रसादही मिळाला. या वेळी प्रचंड घोषणाबाजी झाली. गोंधळाचे वातावरण लक्षात आल्यानंतर सर्वाना भोजनाचे निमंत्रण देण्यात आले व या गोंधळातच अध्यक्षपदी संभाजी पवार यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेल्या श्रावण भिलवंडे व डॉ. अजित गोपछडे यांची सरचिटणीसपदी निवड करून बोळवण करण्यात आली. वरिष्ठ नेत्यांच्या या कृतीचा जिल्हाभरातील अनेक कार्यकर्त्यांनी नंतर निषेध केला.सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी विजय गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत या निवडीची घोषणा केली. कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतील, पण ते नेत्यांमध्ये नाहीत. गोंधळ घालणारे कार्यकर्ते भाजपचे नव्हते असा जावईशोधही त्यांनी लावला. बैठकीत झालेल्या गोंधळाला ‘छुटपूट’ घटना असे संबोधून त्यांनी वेळ निभावून नेली. गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्षपद हे नायगाव, बिलोली, देगलूर तालुक्यांकडेच आहे याकडे लक्ष वेधले असता तो आमच्या पक्षाचा अधिकार आहे, असे उत्तर त्यांनी दिले.
जिल्हाध्यक्ष संभाजी पवार, माजी जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, डॉ. अजित गोपछडे, श्रावण भिलवंडे, डॉ. धनाजीराव देशमुख, लक्ष्मण ठक्करवाड, गंगाराम ठक्करवाड, चैतन्य देशमुख, प्रवीण साले यांची उपस्थिती होती.भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या प्रचंड मरगळ आली आहे. लोकसभा-विधानसभा पाठोपाठ बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. या पाश्र्वभूमीवर एखाद्या नव्या उमेदीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांला संधी देऊन चैतन्य निर्माण करण्याची संधी पक्षाकडे होती, पण पुन्हा संभाजी पवार यांचे नाव लादण्यात आल्याने जिल्हय़ात पक्षाची अवस्था असून नसल्यासारखी होते की काय, अशी भीती कार्यकर्त्यांमध्ये बोलून दाखविली जात आहे.