विशेष गाडय़ांमुळे दिवाळीच्या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई ते नागपूर व पुणे ते नागपूरदरम्यान दहा लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून रेल्वेला साडेदहा कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला. आणखी अडीच लाख रुपये रेल्वेला अपेक्षित आहेत.
नागपूर शहरातील अनेक नागरिक मुंबई, पुणे वा राज्याच्या इतर भागात नोकरीनिमित्त राहतात. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर गावी गेले आहेत. नागपूर-विदर्भात नोकरी करणारे तसेच शिक्षण घेणाऱ्या अनेकांची घरे राज्याच्या इतर भागात आहेत. दिवाळी आली की त्यांना घराची, कुटुंबाची ओढ लागते. अशावेळी ते गावाकडे परततात. शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने या काळात लोक पर्यटनास जातात. रेल्वेला या काळात प्रचंड गर्दी असते. अनेकजण २-३ महिने आधी आरक्षण करून ठेवतात. तरीही आरक्षण मिळत नाही. ही गरज ओळखून मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांनी विशेष रेल्वे गाडय़ा सोडण्याची विनंती मध्य रेल्वेला केली होती. मध्य रेल्वेने १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नागपूर-मुंबई-नागपूर तसेच नागपूर-पुणे-नागपूर विशेष रेल्वे गाडय़ा सोडल्या.  या विशेष गाडय़ांमधून दहा दिवसात १० लाख २२ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून १० कोटी ५४ लाख रुपये रेल्वेला महसूल मिळाला. आरक्षण करणाऱ्यांची संख्या १ लाख १२ हजार होती. त्यातून ६ कोटी १५ लाख रुपये महसूल मिळाला. आरक्षण न केलेल्या प्रवाशांची संख्या ९ लाख ९ हजार होती. त्यातून ४ कोटी ३९ लाख ३९ हजार रुपये महसूल मिळाला.  नागपूर-मुंबई-नागपूर तसेच नागपूर-पुणे-नागपूर दरम्यान आणखी दोन विशेष रेल्वे गाडय़ा सोडल्या जाणार असून त्यातून सुमारे अडीच कोटी रुपये महसूल अपेक्षित आहे. ह फक्त प्रवासी वाहतुकीतून मिळालेला महसूल आहे.  दरम्यान, १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत भारतीय रेल्वेला देशभरातून एकूण सुमारे ७७ हजार २३५ कोटी ६४ लाख रुपये महसूल मिळाला. गेल्यावर्षी १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०१२ मध्ये ६ हजार ८६३ कोटी २६ लाख रुपये महसूल मिळाला होता. तो यंदा १२.५३ टक्के वाढला असल्याची माहिती भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने दिली आहे. १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०१३ या काळात मालवाहतुकीद्वारे देशभरात रेल्वेला ५१ हजार ८७६ कोटी ३३ लाख रुपये महसूल मिळाला. गेल्यावर्षीच्या याच काळातील उत्पन्नाच्या तुलनेत ९.५६ टक्के वाढ झाली. १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०१३ या कळात प्रवासी वाहतुकीद्वारे २१ हजार २४७ कोटी ७९ लाख रुपये महसूल मिळाला. गेल्यावर्षीच्या याच काळातील उत्पन्नाच्या तुलनेत १७.९३ टक्के वाढ झाली.