सोलापूर जिल्हय़ात अलीकडेच एकाच रात्री दोन रेल्वेगाडय़ांवर पडलेल्या सशस्त्र दरोडय़ांमुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रेल्वेसुरक्षा यंत्रणेतील अपुरे मनुष्यबळ विचारात घेता जोपर्यंत कायमस्वरूपी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. तोपर्यंत रेल्वेप्रवाशांची सुरक्षितता टांगणीलाच लागणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, छोटय़ा स्थानकांजवळ रेल्वेगाडय़ा क्रॉसिंगसाठी थांबवू नयेत, अशी सूचना लोहमार्ग पोलीस प्रशासनाने रेल्वे प्रशासनाला केली आहे.
गेल्या बुधवारी मोहोळजवळ अनगर येथे क्रॉसिंगसाठी थांबलेल्या मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेसवर रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला होता. त्यानंतर अवघ्या साडेचार तासांच्या अंतराने कुर्डुवाडीजवळ वाकाव येथे सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस क्रॉसिंगसाठी थांबली असता या गाडीवरही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात लूट केली होती. एकाच दिवशी दोन रेल्वेगाडय़ा सशस्त्र दरोडे पडल्याने रेल्वे सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आता दिवाळी हंगामात रेल्वेगाडय़ांवर प्रवाशांचा भार वाढला असताना, त्यांची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी किमान रात्रीच्या वेळी छोटय़ा व संवेदनशील रेल्वेस्थानकांत रेल्वेगाडय़ांना क्रॉसिंग न देता कुर्डुवाडी, माढा किंवा मोहोळ या तुलनेने मोठय़ा स्थानकात थांबा द्यावा, अशी सूचना लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून माल व प्रवासी वाहतुकीच्या रेल्वेगाडय़ांची संख्या वाढली आहे. रेल्वेगाडय़ांच्या तुलनेने सुरक्षा यंत्रणा तोकडी पडत आहे. सद्य:स्थितीत रेल्वे सुरक्षा यंत्रणेमध्ये ४५० एवढे मनुष्यबळ आवश्यक असताना प्रत्यक्षात ३०० एवढेच मनुष्यबळ उपलब्ध आहे. यात १५० मनुष्यबळाची कमतरता असून, त्याची पूर्तता होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पाठविलेला प्रस्ताव अनेक वर्षांपासून धूळ खात पडला आहे. वास्तविक पाहता सध्या वाढणा-या गुन्हय़ांची संख्या पाहता सुरक्षा मनुष्यबळ किमान ५००पर्यंत उपलब्ध होण्याची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या दोन दिग्गज नेत्यांच्या सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे सुरक्षा यंत्रणेत यापूर्वीच सुधारणा होऊन रेल्वेप्रवाशांची सुरक्षितता मजबूत राहणे अपेक्षित होते. परंतु पाठपुरावा आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजत असल्याचे चित्र वारंवार पाहावयास मिळत असल्याबद्दल सामान्य प्रवाशांमध्ये हा चिंतेचा विषय झाला आहे.