News Flash

ओंगळवाण्या मिरवणुकीला पावसानेच घातले वेसण

अलीकडे रूढ झालेल्या प्रथेप्रमाणे डीजेच्या दणदणाटासह ओंगळवाणे प्रदर्शन करणा-या नगर शहरातील विसर्जन मिरवणुकीला अखेर पावसानेच वेसण घातली. पावसामुळे नगरकरांनी सायंकाळीच या मिरवणुकीकडे पाठ फिरवल्याने कमालीच्या

| September 20, 2013 01:57 am

अलीकडे रूढ झालेल्या प्रथेप्रमाणे डीजेच्या दणदणाटासह ओंगळवाणे प्रदर्शन करणा-या नगर शहरातील विसर्जन मिरवणुकीला अखेर पावसानेच वेसण घातली. पावसामुळे नगरकरांनी सायंकाळीच या मिरवणुकीकडे पाठ फिरवल्याने कमालीच्या नीरस ठरलेल्या या मिरवणुकीची निर्धारित वेळेनुसार रात्री १२ वाजता सांगता झाली. पोलिसांनी ठरवून दिल्याप्रमाणे मिरवणुकीत मानाच्या पहिल्या श्री विशाल गणपतीसह एकूण तेरा मंडळेच सहभागी झाली होती. सावेडीतील विसर्जन मिरवणुकीत पंधरा मंडळे सहभागी झाली होती, तिथेही डीजेचाच दणदणाट होता.
गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुकीतच शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीमुळे सतर्क झालेल्या पोलीस यंत्रणेने विसर्जन मिरवणुकीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संवेदनशील नेता सुभाष चौकाला तर पोलीस छावणीचेच स्वरूप आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे जातीने मिरवणुकीत सहभागी झाले होते.    
मानाप्रमाणे शाही स्वारी व पारंपरिक तालवाद्यांच्या प्रेक्षणीय आणि श्रवणीय डावासह शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरातील उत्सवमूर्ती आणि माळीवाडय़ातील कपिलेश्वर गणेशोत्सव मंडळ या दोनच मिरवणुका छचोर गोष्टींना अपवाद ठरल्या. उर्वरित ११ मंडळांनी नेहमीप्रमाणे डीजेच्या कर्णकर्कश आवाजात हिडीस गर्दी जमवतानाच नेत्यांची छबी असलेले फलक फडकावत ओंगळवाण्या प्रदर्शनाचीच परंपरा कायम राखली. सायंकाळी सातच्या सुमारास शहरात पावसाला सुरुवात झाली आणि लगेचच मिरवणुकीतील गर्दीही पांगली. मिरवणुकीचा मार्गही ओस पडला. तोपर्यंत मानाचा पहिला गणपती दिल्ली दरवाजाजवळ आला होता. तो येथून बाहेर पडताच पावसाला प्रारंभ झाला. आम नगरकरांनी मुळातच मिरवणुकीकडे पाठ फिरवली होती, पावसामुळे उरलीसुरली गर्दीही पांगली. पाऊस सुरू झाल्यानंतर मिरवणुकीत नाचणा-यांशिवाय कोणी राहिले नव्हते. सायंकाळी ७ला सुरू झालेला पाऊस रात्री बारापर्यंत टिकला, मधला काही काळ तर मुसळधार सरी कोसळल्या.
प्रथेप्रमाणे शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरातील उत्सवमूर्ती गणरायाची बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या हस्ते सपत्नीक आरती व उत्थापनाची पूजा होऊन पारंपरिक रथ व शाही लवाजम्यात हा गणपती सार्वजनिक मिरवणुकीकडे मार्गस्थ झाला. मात्र यंदा रामचंद्र खुंटावर येण्यासच या मानाच्या पहिल्याच गणपतीला सुमारे दीड तास विलंब झाला, त्यामुळे विसर्जन मिरवणुकीची सुरुवातच विलंबाने झाली. रामचंद्र खुंटावर येईपर्यंतच रस्त्यात ठिकठिकाणी दर्शनासाठी झालेली गर्दी व आरत्या यामुळे कधी नव्हे तो हा गणपती मिरवणूक मार्गाकडे मार्गस्थ होण्यास विलंब लागला. देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह अन्य विश्वस्त हा विलंब टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते, मात्र त्याला फारसे यश आले नाही. हा गणपती रामचंद्र खुंटावर आल्यानंतर दुपारी १२.३०च्या सुमारास प्रथेप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या हस्ते येथे आरती होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
मानाच्या या पहिल्या गणपतीचा थाट नेहमीप्रमाणे होता. अग्रभागी नगारा, मग नगरच्याच ऱ्हिदम ग्रुपचे ढोलताशांचे १२५ जणांचे पथक, त्यामागे शालेय विद्यार्थ्यांचे लेझिम पथक होते. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती, विशेषत: डाळ मंडई, कापड बाजार, बँक रोड, नवी पेठ या बाजारपेठांमध्ये व्यापा-यांची दर्शनासाठी गर्दी होती. या मार्गावर रांगोळय़ा काढण्यात आल्या होत्या. नेहमीप्रमाणे या गणपतीपुढील ढोलताशांचे पथक, लेझिमचा डाव हेच या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. सायंकाळी ७.३० वाजता म्हणजे सुमारे दीड तास विलंबाने हा गणपती दिल्ली दरवाजा वेशीबाहेर पडला. माळीवाडय़ातील कपिलेश्वर गणेशोत्सव मंडळ याही वर्षी डीजे व तत्सम गोष्टींना फाटा देऊन पारंपरिक मंगलमय वातावरणात विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. मंडळापुढे भजनी मंडळ होते.
मिरवणुकीतील उर्वरित मंडळांनी मात्र डीजेच्याच तालावर ओंगळवाणे प्रदर्शन केले. मानाच्या पहिल्यासह माळीवाडय़ातील बारा आणि शेवटी शिवसेनेचा अशी तेरा मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली होती. राष्ट्रवादी व अन्य मंडळांना पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे आमदार अरुण जगताप, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप आदी माळीवाडय़ातील शिवशंकर मित्रमंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आमदार अनिल राठोड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत लोढा, संजय झिंजे आदीही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावर अनेक ठिकाणी विविध मंडळांनी पाणी, नाश्ता, चहा अशी व्यवस्था केली होती.       

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 1:57 am

Web Title: rainfall controlled on hideous show in procession of ganesha
टॅग : Ganesha,Rainfall
Next Stories
1 जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार?
2 वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास न्यायालयाचा नकार
3 इचलकरंजीच्या नगराध्यक्षा आज राजीनामा देणार
Just Now!
X