टोलविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या बुधवारी राज्यभर होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनामागे विरोधकांमध्ये फूट पडावी आणि सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीचाच फायदा व्हावा हाच हेतू असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी केला. मंगळवारी दुपारी मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर जाण्यासाठी देसाई हे सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली. त्या वेळी बोलताना त्यांनी मनसे तथा राज ठाकरे यांच्यावर कडवट टीकास्त्र सोडले. टोलविरोधात राज ठाकरे यांनी पुण्यात जाहीर सभेतून जाहीर केलेल्या आंदोलनाला सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीची फूस असून हे राज ठाकरे यांचे केवळ नाटक आहे. यापूर्वीही राज ठाकरे यांनी केलेल्या आंदोलनांचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच झाला, अशी टिपणी देसाई यांनी केली.
ते म्हणाले, राज ठाकरे यांनी टोलविरोधी आंदोलनाचे नेतृत्व आपण स्वत: करणार असल्याचे जाहीर करीत आपणास अटक करून दाखवा, असे दिलेले आव्हान म्हणजे शुद्ध नाटक आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी केलेल्या टोलविरोधी आंदोलनाचे काय झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळणार आणि काँग्रेस व राष्ट्रवादी जोरदार आपटले जाणार, ही काळ्या दगडावरची रेष असल्याचा दावाही देसाई यांनी केला.