कोल्हापूरच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अपेक्षित असलेली ‘बुफे’ प्रकारची मेजवानी मनाप्रमाणे रंगली नाही. तरीही तिने राज्याचे राजकारण, समजाकारणासमोर काही वादाचे मुद्दे मात्र जरूर उपस्थित केले. स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करीत ‘एकला चलो रे’ ही भूमिका कायम ठेवल्याने टाळीचा आवाज उमटला नसल्याने त्याच्या वादाचे पडसाद राज्याच्या राजकारणात निनादत राहतील. काही हजार कोटी रुपये खर्चून अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यापेक्षा या पैशात शिवरायांचे किल्ले दुरुस्त करण्याच्या त्यांच्या सुचनेने या विषयाला पुन्हा चर्चेचे स्थान प्राप्त झाले आहे.
गेली काही दिवस राज ठाकरे हे ‘काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही’ असा पवित्रा घेत राहिले.जे बोलेन ते कोल्हापूरतच असे उत्तर त्यांच्याकडून यायचे. कोल्हापुरात बोलायला उभे राहिल्यावर जवळ असलेल्या कागदपत्रांची चळत दाखवत त्यांनी एकेकांचे वस्त्रहरण करणार असल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात त्यातील मजकूर काही बाहेर आलाच नाही. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार अनेक पातळ्यांवर अपयशी ठरत आहे. या स्थितीत राज्याची सत्ता मिळविणे कठीण नाही. अशीच शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीची भावना आहे. सत्तेचे सिंहासन काबीज करताना ‘राज-मार्ग’ आडवा येत असल्याचेही त्यांना स्पष्टपणे जाणवत आहे. मनसे युतीत सामावली की सत्ता आपलीच अशी खुशीची गाजरे खाणाऱ्या युतीतील नेत्यांना विशेषत शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांना जाहीर सभेत राज ठाकरे यांनी फटकारले. पहिल्याच दमात १३ आमदार निवडून आणण्याचा विश्वास दुणावलेल्या राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीतही स्वबळावर लढण्याची घोषणा केली. टाळीचा प्रतिसाद विरला उलट थेट चर्चेला या असे सांगत टोलाही लगावला. निवडणुकीचे रणांगण तापण्यास अजून कालावधी असल्याने तोपर्यंत तरी टाळी वाजते का याची आता प्रतीक्षा करावी लागेल.    
स्मारकाचा विषय भावनिक असतो, हे सांगत राज यांनी शिवाजीमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहूमहाराज स्मारकाचे दाखले सभेत दिले. शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकावर पाच हजार कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा त्यांचे किल्ले दुरुस्त करण्याची सूचना करून या विषयाला त्यांनी वेगळी दिशा दिली आहे.     
तासभर धडाडलेल्या राज तोफेने सत्ताधाऱ्यांचे बऱ्यापैकी वस्त्रहरण झाले. टोल आकारणी, शासकीय नोकरीसाठी उर्दू-हिंदी भाषेला मुभा, महिलांवरील अत्याचार, स्थानिक समस्या या विषयांवरून डॉ.मनमोहनसिंगांपासून ते पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार ते आर.आर.पाटील अशा सत्तेतील अनेक नेत्यांना त्यांनी फैलावर घेतले. अतिउत्साही राजप्रेमींमुळे अखेर सभा आवरती घ्यावी लागल्याने दुष्काळ, भ्रष्टाचार असे शेलके पदार्थ मेजवानीत समाविष्ट करता आले नाहीत. एकमात्र निश्चित की ‘महाराष्ट्राच्या हिताचे ते बोलणार’ असे म्हणत राज ठाकरे यांनी मनसेची मताची टक्केवारी कशी वाढेल यावर भर दिला. ‘मत मागायला नव्हे, मांडायला आलो आहे’ असे म्हणत त्यांनीही मतांचीच बेगमी केली. पाहुया ती मतपेटीत किती व कशी परावर्तित होते ते.