इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय बोलक्या बाहुल्या महोत्सवात रामदास पाध्ये त्यांच्या बोलक्या बाहुल्यांसह सहभागी झाले आहेत. या महोत्सवात जगभरातील निवडक ३८४ शब्दभ्रमकार ‘बाहुली नाटय़’ सादर करणार असून त्यात पाध्ये यांची निवड करण्यात आली आहे. या महोत्सवासाठी ‘ग्लोबल वॉर्मिग, इट्स ए वॉर्निग’ असे घोषवाक्य असून पाध्ये या महोत्सवात पारंपरिक भारतीय कळसुत्री बाहुली आणि आधुनिक बाहुल्यांच्या सहाय्याने प्रयोग सादर करणार आहेत. ‘पर्यावरण वाचवा आणि पृथ्वीचे संरक्षण करा’ असा संदेश या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून पाध्ये देणार आहेत. पाध्ये जे ‘बाहुली नाटय़’सादर करणार आहेत, त्याचे संगीत प्रशांत ठाकरे यांचे असून या महोत्सवात रामदास पाध्ये यांच्याबरोबर अपर्णा, सत्यजित, ऋजुता आणि परिक्षित हे पाध्ये कुटुंबीयही सहभागी होणार आहेत.