पोलीस महिला कर्मचाऱ्यास अश्लील एसएमएस पाठविणे, हावभाव करणे व लैंगिक छळ केल्याच्या कारणावरून पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचे वृत्त आहे. अमृता आकोलकर या पोलीस महिलेने आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लैंगिक छळ केल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती. या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा, असे आदेश पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत. या वृत्तास प्रभारी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दुजोरा दिला.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथील पोलीस आयुक्तालयात महिला पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीची चर्चा दररोज होत आहे. ज्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने तक्रार दिली होती, तिने सातारा पोलीस ठाण्यात जर फिर्याद दिली, तर उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया होऊ शकते, असे अधिकाऱ्याने सांगितले. रात्री-बेरात्री दूरध्वनीवरून बोलणे व लैंगिक छळ करणे या प्रकरणात संदीप भाजीभाकरे दोषी आहेत किंवा नाही, याची चौकशी नुकतीच करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी केलेल्या या चौकशीचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदलीही करण्यात आली. या प्रकरणात कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यास वरिष्ठांनी परवानगी दिल्याची माहिती आहे. दरम्यान, फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी गायब असून तिने तक्रार दिली तर गुन्हा दाखल करणे शक्य होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या शोधासाठी दिवसभर काही पोलीस कर्मचारी फिरत होते. या प्रकरणाच्या अनुषंगाने प्रभारी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना विचारले असता ते म्हणाले, अशा पद्धतीचा गुन्हा अजून दाखल झालेला नाही. तथापि, वरिष्ठ कार्यालयाकडून गुन्हा दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळ झाल्याबाबतची तक्रार शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडेही केली होती. त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.