ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचालित ज्ञानदीप महाविद्यालयाची विद्यार्थिनी रश्मी विनोद जोयसरने वाणिज्य शाखेच्या पदवी परीक्षेत ९५.१४ टक्के गुण मिळवत मुंबई विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. एकूण ८६,००० विद्यार्थ्यांमधून पहिला येण्याचे मान पटकविताना सातपैकी चार विषयांतही ती प्रथम आली आहे.
यानिमित्ताने विद्यापीठाच्या मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला असून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तिचे विशेष कौतुक केले, तसेच पुढील महिन्यात ज्ञानदीप महाविद्यालयाला भेट देण्याचे आश्वासनही दिले. यानिमित्त बोलताना विद्यापीठाचे वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. मधू नायर यांनी मुंबई विद्यापीठात एखाद्या शाखेत ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने प्रथम येण्याचा मान पटकाविणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.
या वेळी त्यांनी नव्याने सुरू झालेल्या ज्ञानदीप विद्यापीठाचे ग्रामीण विभागातील हुशार मुलांना शोधून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना योग्य संधी देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कौतुकही केले.