करावे गावालगत असणाऱ्या पामबीच मार्गावर दिवसेंदिवस वाढणारे अपघात लक्षात घेता या ठिकाणी भुयारी मार्ग बांधावा या प्रलंबित मागणीसाठी करावे ग्रामस्थ मंडळाने मंगळवारी येथे रास्ता रोको आंदेालन केले. या आंदोलनात सर्व पक्षीय नेते व करावे गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.
पामबीच मार्गाचे बांधकाम सुरू असताना सिडकोने प्रत्येक गावालगत पारंपरिक मच्छीमार बांधवांसाठी पामबीच मार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग बांधणे आवश्यक होते. परंतु भुयारी मार्ग करण्यात न आल्यामुळे पामबीच मार्ग सुरू झाल्यापासून करावे गावातील १२ ते १३ मच्छीमारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर मागील दोन महिन्यांत करावे गावातील दोघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. करावे गावासाठी पामबीच मार्ग हा मृत्यूचा सापळा ठरलेला आहे. त्यामुळे सिडको व पालिकेचे याकडे लक्ष वेधण्यासाठी करावे गावातील ग्रामस्थांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी महानगरपालिका उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी भुयारी मार्गाचा प्रस्ताव येत्या महासभेत सभागृहासमोर येणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.