दारिद्रय़रेषेच्या यादीत काही लोकांची नावे नसल्याने पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात येत आहे.
मतदारसंघ निहाय झोन कार्यलये निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने उत्तर विभागासाठी कामठी रोडवर टेका नाका, लाल गोदाम येथे नव्याने निर्माण केलेल्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार डॉ. नितीन राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. सार्वजनिक वितरण प्रणाली पारदर्शक होण्याकरिता रेशन कार्डाच्या संगणकीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून राज्यात सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले. काही ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे. नागरिकांना हे काम पूर्ण होताच संगणकीकृत कार्ड देण्यात येतील.  अन्न धान्य  वितरण दुकानातील साठय़ाची माहिती जिल्हा व जिल्ह्य़ाची माहिती राज्यस्तरावर संगणकीकरण झाल्यावर प्राप्त होईल.
तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा गैरवापर संगणकीकृत कार्ड दिल्याने होणार नाही. सध्या ५ लाख रेशनकार्डधारक नागपूर शहरात असून दरमहा मंजूर झालेल्या धान्याची माहिती स्थानिक समितीला एसएमएसद्वारे दिली जाते. अन्न सुरक्षा योजना नागरिकांसाठी राबविली जाणार असून ग्रामीण भागातील ८० टक्के व शहरी भागातील ६५ टक्के लोकांना या योजनेचा लाभ होईल. या योजनेंतर्गत गहू २ रुपये तर तांदूळ ३ रुपये किलोने देण्यात येईल. तसेच अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याची ७७ पदे भरल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले.