कुठल्याही परीक्षेला सहजपणे सामोरे जाता येण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने ठराविक परीक्षा देण्यापुरता अभ्यास न करता विषयांचा अभ्यास करावा. एकदा विषय समजला की, सर्व सोपे होते, असे विचार प्रा.डॉ. नितीन ओक यांनी व्यक्त केले. क्रिएटीव्ह क्लब अकोलाद्वारा आयोजित परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
आयआयटी, जेईई व एनईईटी युजी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी आठवीपासूनच अभ्यासाचे नियोजन कसे करावे, या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. पाठय़पुस्तकांचे वाचन न चुकता करा व गाईडचा उपयोग टाळा. तसेच ऑडिओ व्हिजुअल साधनांचा वापरही टाळा. मुख्यत: पुस्तकांवरच भर द्या. वाचाल तर वाचाल, हे महत्त्वाचे आहे. वाचण्याला पर्याय नाही. वाचन केल्याने कल्पनाशक्ती वाढते व मेंदूही कार्यक्षम राहतो. श्वास, अन्न यांच्याइतकेच महत्त्व पुस्तकांना दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
अभ्यास करताना पुस्तकातून उत्तर शोधण्याची सवय ठेवा. प्रत्येक गोष्टीसाठी गुगल सर्चवर जाण्याची प्रवृत्ती वाढीस लागली, ही बाब विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला मारक व घातक आहे, असे स्पष्ट करून ते म्हमाले, दूरचित्रवाणी, व्हीडीओ गेम्स यापासून विद्यार्थ्यांनी स्वत:ला दूरच ठेवायला हवे. यामुळे विद्यार्थ्यांंचा आपण बुद्धय़ांक कमी करीत आहोत, याचे भान पालकांनी ठेवणे जरुरी आहे. विद्यार्थ्यांंच्या अभ्यासाकडे अति लक्ष देणे वा गरज नसताना त्यांना मदत करणे या प्रवृत्तीमुळे विद्यार्थ्यांची निर्णय घेण्याची क्षमता आपणच संपवित आहोत, याकडे लक्ष देण्यात यावे.  वेळेचे नियोजन करण्यावर भर द्या. आपल्या पाल्याकडून स्वत:च्या अपूर्ण इच्छा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न पालकांनी करू नये. तसे होत असल्याने विद्यार्थ्यांवरील दडपण वाढते व तो योग्य पद्धतीने अभ्यास करू शकत नाही. ही बाब पालकांनी मुख्यत: लक्षात घ्यावी, असे ओक म्हणाले. प्रास्ताविक व आभार क्रिएटीव्ह क्लबचे संचालक व प्रसिद्ध व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनी केले, तर संचालन ऋषिकेश मोरे यांनी केले. क्लबच्या अनेक सदस्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.