गेल्या तीन वर्षांपासून खापरी येथे तयार असलेल्या घर संकुलाचे वाटप कलकुई, तेल्हारा व दहेगाव येथील मिहान प्रकल्पग्रस्तांना लवकरच करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने कलकुई, तेल्हारा व दहेगाव येखील गावठाण हलवण्याबाबत कायदेशीर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली असून प्रकल्पग्रस्तांची अंतिम यादीही तयार करण्यात आली आहे.
या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. पुनर्वसनासाठी ३० कोटी निधीचा प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेर त्यावर शिक्कामोर्तब करून प्रकल्पग्रस्तांचे खापरी येथे बांधण्यात आलेल्या ६८० घर संकुलांमध्ये पुनर्वसन करण्याची आशा आहे. आणखी शंभर घर संकुलाची गरज भासणार आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला सोय करावी लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तयार करण्यात आलेल्या घर संकुलांचे वाटप समारंभातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्तांना करण्यात येणार असल्याचा मानस महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे सह संचालक प्रवीण दराडे यांनी व्यक्त केला आहे.
जयताळा व शिवणगाव येथील भूमालकांनी प्रकल्पासाठी जमीन देण्याची संमती दिली असून भामटीतील ८८ हेक्टर जमिनीपैकी २६ हेक्टर जमीन अधिग्रहित करावयाची बाकी आहे. जमिनीच्या मोबदल्यासाठी ३०२ कोटी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे पाठवला आहे. शासनाने प्रकल्पग्रस्तांना दिलेला शब्द पाळून वेळेच्या आत मोबदला देऊ, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.