येथील नौपाडा विभागातील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये येत्या बुधवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेत ‘पुन्हा एकदा शाळेत’ अर्थात ‘बॅक टू स्कूल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. शाळेच्या नव्या इमारतीचे बांधकाम नव्या वर्षांत गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे.
इमारत, वर्ग, बाके, शिक्षक, मधल्या सुट्टीतले डबा खाणे, तसेच शाळेच्या आवारात शाळू सोबत्यांसोबत केलेली भटकंती अशा शाळेशी निगडित अनेक आठवणी विद्यार्थ्यांच्या मनात कायम असतात.
 शाळेच्या पुनर्निर्माणानंतर या सर्व आठवणी पुसल्या जाणार आहेत. त्यामुळे ‘पुन्हा एकदा शाळेत’ उपक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या आठवणींचा अल्बम पुन्हा एकदा चाळण्याची संधी शाळा व्यवस्थापनाने दिली आहे.
विशेष म्हणजे या विशेष मेळाव्यात शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिकाही जुन्या भूमिकेत शिरून वर्गात शिकविणार आहेत.
अ. गो. टिळक, सहस्रबुद्धे, रसाळ, राजे, नंदिनी बर्वे, आंबेकर, बोटे, ठोकळे, तेली, शिंदे, कांबळे आदी शिक्षक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या वेळी शाळेचे विश्वस्त शाळेच्या पुनर्निर्माण प्रकल्पाची माहिती माजी विद्यार्थ्यांना देणार आहेत.
अशा प्रकारचा बॅक टू स्कूल उपक्रम दर महिन्याच्या एका रविवारी सकाळी आयोजित करण्यात येणार आहे.