सध्या सर्वच समाज आरक्षण मागत आहेत, सरकारही कोणाकोणाला आरक्षण द्यावे या संभ्रमावस्थेत आहे, उपेक्षित व गरीब वर्गाला न्याय द्यायचा असेल तर आरक्षण समाजाला नव्हे तर आर्थिक निकषावर द्यावे तरच समाजातील शेवटच्या घटकाला खऱ्या अर्थाने फायदा होईल, असे मत खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज नगरमध्ये झाली, त्याच्या उद्घाटनप्रसंगी खा. गांधी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्याक्ष श्यामराव जोशी होते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, महापौर संग्राम जगताप, उद्योजक विनोद त्रिवेदी आदी या वेळी उपस्थित होते.
भारतात जातिपातींच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत, सर्वांनी मिळून या भिंती पाडण्यासाठी एकत्र यायला हवे, असे आवाहन करुन खा, गांधी म्हणाले, ब्राह्मण समाज सुसंस्कृत आहे, त्याने देशाला दिशा देण्यासाठी एक व्हावे, समाजाच्या केंद्र व राज्य सरकारकडे असलेल्या मागण्यांचा आपण पाठपुरावा करू. महापौर जगताप यांनी समाजाने सुचवलेल्या योजनांचा महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सर्व समाज हक्कासाठी भांडत असताना केवळ ब्राह्मण महासंघाने सरकारकडे कोणतीही मागणी केलेली नाही. समाजाचे संघटन करून समाजाला व देशाला सक्षम करण्याचे प्रयत्न महासंघामार्फत सुरू असल्याची माहिती गोविंद कुलकर्णी यांनी दिली. समाजातील तरुणांना उद्योगव्यवसायाचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात दरमहा बैठका होत असल्याची माहिती जोशी यांनी दिली. राष्ट्रवादी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष नीलेश कुलकर्णी, उद्योजक त्रिवेदी यांची भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष प्रा. मधुसूदन मुळे यांनी स्वागत केले. प्रदेश सरचिटणीस अमोघ टेंभेकर यांनी सूत्रसंचालन केले. धोंडोपंत कुलकर्णी यांनी आभार मानले.