‘आयपीएल’ सामन्यांचा हंगाम ऐन भरात येत असताना आता उन्हाळय़ाच्या सुटय़ांचा हंगामही सुरू झाल्याने मित्रमंडळींसह सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी क्रिकेटशौकीनांचे अड्डे रंगू लागले आहेत. ‘आयपीएल’च्या हंगामात आपल्या धंद्याचाही हंगाम चांगला जावा यासाठी मंदीशी झगडत असलेला रेस्टॉरंट उद्योगही सरसावला आहे. डोळय़ांना आणि जिव्हेला खुणावतील असे नानातऱ्हेचे चमचमीत मांसाहारी-शाकाहारी स्टार्टर, जेवण आणि त्यासोबत फेसाळती बीअर अशी दीड ते तीन हजारांची खास पॅकेज तयार करत क्रिकेटशौकिनांना आपल्या रेस्टॉरंटकडे आकर्षित करण्याची जोरदार स्पर्धा रंगली आहे.‘आयपीएल’चा हंगाम सुरू झाला की त्या अवधीतील ‘टीआरपी’चा फायदा उचलण्यासाठी बाजारपेठ सरसावत असते. अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी आयपीएल सामन्यांच्या वेळेला प्राधान्य देतात. उन्हाळय़ाच्या सुटीचा हंगाम सुरू झाल्याने मित्रमंडळींसह ग्रुप जमवत खात-पीत मजा करत ‘आयपीएल’ सामने पाहण्याकडे अनेकांचा कल असतो. मद्यावरील करांमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झाल्याने सरसकट रेस्टॉरंटमध्ये जाऊन मद्यपान-मांसाहार करण्याकडे असलेला शौकिनांचा कल थोडा कमी झाला आहे. चक्क ‘थर्टी फर्स्ट’सारख्या दिवशीही रेस्टॉरंटना त्याचा फटका बसला. त्यामुळे ‘आयपीएल’चा हंगाम साधण्यासाठी रेस्टॉरंटचालक सरसावले आहेत. शहर व उपनगरातील मोठे नामांकित रेस्टॉरंट, पंचतारांकित हॉटेलांमधील रेस्टॉरंटनी त्यासाठी खास मेन्यू तयार केले आहेत. दुपारी चार आणि रात्री आठ वाजता आयपीएलचा सामना असतो. त्यानुसार दुपारी चारच्या सामन्यासाठी चिकन टिक्का, स्पॅनिश चिकन विथ लेमन अँड गार्लिक, सीख कबाब यासारख्या नानाविध चमचमीत स्टार्टरसह बीअर असे पॅकेज करण्यात आले आहेत. तर रात्रीच्या सामन्यासाठी या मेन्यूत जेवणही समाविष्ट करण्यात आले आहे. प्रतिमाणशी दीड हजारापासून तीन हजार रुपयांपर्यंतची ही पॅकेज आहेत.