प्रतिकूल परिस्थितीवर मात करून निरनिराळ्या क्षेत्रात यशाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची थेट भेट घडवून आणणारी इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची वेध प्रबोधन परिषद यंदा १३ ते १५ डिसेंबर दरम्यान श्रीसमर्थ सेवक मंडळाचे पटांगण, गडकरी रंगायतनसमोर येथे भरणार आहे. ‘जीवनाचा ताल आणि तोल’ (वर्क लाइफ बॅलेन्स) हे यंदाच्या परिषदेचे विषयसूत्र आहे.
 शुक्रवार १३ डिसेंबर रोजी ज्येष्ठ लेखक विचारवंत, संशोधक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या मुक्त चिंतनाने वेध व्यवसाय परिषदेची सुरुवात होईल. त्यानंतर तीन दिवस चालणाऱ्या विविध सत्रांमध्ये अनेक मान्यवरांची भेट घेता येणार आहे. ‘सोबतीने चालताना’ या सत्रामध्ये अनिल अवचट यांच्या कन्या आणि मुक्तांगण व्यसनमुक्त केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर तसेच त्यांचे पती संगणकतज्ज्ञ आशीष पुणतांबेकर यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. इंडोको रेमेडीजच्या संचालिका आदिती पाणंदीकर आणि त्यांचे रेडिओलॉजिस्ट पती डॉ. मिलिंद पाणंदीकर, ‘कुटुंब रंगलंय खेळात’ या सत्रात डोंबिवलीतील ज्युडो क्रीडा प्रकाराला वाहून घेतलेल्या मॅथ्यू कुटुंबीयांशी गप्पा मारल्या जाणार आहेत. तर दृक्-श्राव्य सत्रामध्ये वास्तुविशारद शिरीष बेरी घराच्या वास्तूचा तोल आणि ताल उलगडणार आहेत.
निरनिराळ्या क्षेत्रांतील मान्यवरांच्या दृष्टिकोनातून जीवनाचा ताल, तोल उलगडण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, चित्रकार प्रभाकर कोलते, आहारतज्ञ ऋजुता दिवेकर, शास्त्रज्ञ डॉ अमोल दिघे यांच्याशी गप्पा मारल्या जाणार आहेत. संगीत आणि संगणक या दोन क्षेत्रांत कार्यरत असलेले आनंद भाटे यांच्या बालपणापासूनचा विलक्षण प्रवास उलगडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सध्या लोकप्रिय असलेल्या ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेतील उमेश कामत आणि स्पृहा जोशी या सर्वाशी डॉ. आनंद नाडकर्णी, पत्रकार रवींद्र मांजरेकर आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. दीपिका दाबके संवाद साधणार आहेत.
वेध विशेष..
प्रसिद्ध व्यक्तींबरोबरच प्रसिद्धीपासून दूर असलेल्या मंडळींची ओळख ‘वेध विशेष’ या सत्रातून करून दिली जाणार आहे. खानदेशातील चहा विकणारा तरुण ते ओरिसामध्ये आयएएस बनण्यापर्यंतचा राजेश पाटील यांचा प्रवास, मराठवाडय़ातल्या एका अनाथ तरुणाने सुरूकेलेले अनाथांसाठीचे ‘घर’, त्यासाठी करावा लागलेला खडतर प्रवास आणि काश्मीरमध्ये सैन्य दलामध्ये कार्यरत असलेल्या मेजर जनरल आर. आर. निभोरकर यांची ओळख या सत्रात होणार आहे.