लग्नात भेट मिळालेल्या रोख रकमेसह दोन लाखाहून अधिक रकमेचा ऐवज एका महिलेने लांबवला. उत्तर अंबाझरी मार्गावरील वानखेडे सभागृहात हा प्रकार घडला.
अरविंद शंकर वासनिक (रा. उज्ज्वलनगर) यांच्या मुलीचे लग्न उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहात होते. लग्नात आलेल्या अनेक पाहुण्यांनी त्यांना भेटवस्तू दिल्या. लिफाफ्यातून काहींनी रोख रक्कमही दिली. रोख रक्कम असलेली पाकिटे व सोन्याचे दागिने त्यांनी एका मोठय़ा थैलीत भरून ठेवले होते. लग्न समारंभ संपल्यानंतर ही थैली दिसली नाही. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. रोख दोन लाख रुपये व सोन्याचे दागिने चौदा हजार रुपये, असा एकूण २ लाख १४ हजार रुपयांचा ऐवज या थैलीत होता. एका अनोळखी महिलेने लांबविल्याची शंका आल्याने अरविंद वासनिक यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी एका ४० ते ५० वर्षांच्या संशयित महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
खेडुले कुणबी समाज भवनातही चोरी
दुसरी घटना रामभाऊ म्हाळगी नगर रिंग रोडवरील खेडुले कुणबी समाज भवनात घडली. माला राजेंद्र चकोले (रा. रामटेक) या त्यांच्या पुतणीच्या लग्नासाठी नागपुरात आल्या. त्या एका खोलीत कपडे बदलवित होत्या. यावेळी त्यांनी त्यांची पर्स एका टेबलावर ठेवली होती.
कुणीतरी त्यांच्या पर्समधील रोख सात हजार व सोन्याचे टॉप्स, असा एकूण तेरा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार त्यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात केली. सक्करदरा पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ऑटोतील महिला प्रवाशाला लुटले
तिसरी घटना धंतोली ते देवनगर चौकादरम्यान ऑटो रिक्षात घडली. रेखा कृष्णराव दिवटेलवार (रा. नगरधन) या पतीसह रामटेकहून नागपूरला आल्या. व्हरायटी चौकातून ते दोघे ऑटोरिक्षाने त्यांच्या भाच्याकडे जाण्यास निघाले. त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत (किंमत ५० हजार रुपये) चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या घटनेची तक्रार त्यांनी धंतोली पोलीस ठाण्यात केली. ऑटोरिक्षातून प्रवास करणाऱ्या ३० ते ३५ वर्षांची अनोळखी महिला व १० ते १२ वर्षांचा अनोळखी मुलगा या दोघांनी धंतोली ते देवनगर चौक दरम्यान ही चोरी केल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला.