जिल्हय़ात दुष्काळाचे चटके बसण्यास सुरुवात झाली असून घरफोडी, भुरटय़ा चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. लातूर तालुक्यातील कासारखेडा शिवारात हेमाडपंती महादेव मंदिराच्या कळसाची चोरी झाली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. चोरटय़ांनी गावोगावच्या मंदिरांना आता लक्ष्य केले आहे.
कासारखेडा शिवारातील मांजरा नदीपात्रात असलेल्या प्राचीन भीमाशंकर मंदिराचा मोठा कळस होता. कळस सोन्याचा असल्याचा काही गावकऱ्यांचा दावा आहे. काहींनी कळसाला सोन्याचा मुलामा दिला असल्याचे म्हटले. कळसाची चोरी झाल्यामुळे गावकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी स्वत: मंदिराची पाहणी केली. जिल्हय़ातील गावोगावच्या मंदिराच्या विश्वस्तांनी दानपेटय़ा मंदिरातील मूर्ती व कळसाच्या रक्षणाची व्यवस्था करावी. विश्वस्तांनी जागरूक राहावे, अशा सूचना दिल्या.