नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा दणदणीत विजय झाल्यामुळे महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष या विजयात आपला किती मोठा वाटा आहे हे मांडू लागला असला तरी त्यांचे दावे आणि प्रत्यक्ष प्रचारातील सहभाग यांत असलेली तफावत कार्यकर्त्यांच्या चांगलीच लक्षात आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) स्थानिक नेत्यांच्या भूमिकेविषयी महायुतीत सुरूवातीपासून संशयाचे वातावरण होते. काही नेते तर उघडपणे आघाडीच्या प्रचारात सहभागी झाल्याचेही दिसून आले. असे असले तरी महायुतीच्या विजयामुळे रिपाइंची ‘झाकली मूठ..’ कायम राहिली.
नाशिकरोड, मध्य नाशिकमधील काही भाग, सातपूर या भागात रिपाइंचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. महायुतीत रिपाइंचा समावेश झाल्याने दलित मते महायुतीच्या उमेदवाराकडे वळतील असे नेत्यांना वाटत होते. परंतु सेना-भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते रिपाइं महायुतीत आली तरी दलित मते सेना-भाजपकडे येणार नाहीत या मताचे होते. त्यातच छगन भुजबळ यांच्यासारख्या प्रबळ नेत्याची महायुतीविरोधात उमेदवारी असताना रिपाइंची मते महायुतीकडे येतीलच कशी, असा प्रश्न केला जात होता.
शहरातील दलित मतांचा आघाडीला फायदा होण्यासाठी येवल्यात उभारण्यात आलेले स्तूप दाखविण्याकरिता शहरातून गाडय़ा जात होत्या. शिवाय शहरातील झोपडपट्टय़ांमधील मतदान पारंपरिकपणे काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ देणारे मानले जाते. त्यातच रिपाइंच्या नेत्यांनी वारंवर व्यक्त केलेली नाराजी पाहता रिपाइंचा महायुतीला विशेष लाभ होणार नसल्याची सेना-भाजपच्या कार्यकर्त्योची भावना झाली होती. परंतु महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे मात्र काही प्रमाणात का असेना नाशिकरोड परिसरातील दलित मते आपणांस मिळतील या मताचे होते.
प्रचार एकेक दिवस पुढे सरकू लागला. त्याप्रमाणे प्रचारात वेगवेगळे रंग भरू लागले. विविध दलित नेत्यांनी एकत्र येऊन भुजबळांमागे ‘दलित शक्ती’ उभी केली. या शक्तितर्फे भुजबळांनाच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. सातपूर परिसरात आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांची प्रचारफेरी निघाली असता रिपाइंचे नेते प्रकाश लोंढे हे भुजबळ यांच्याशी गुफ्तगू करत असल्याचे छायाचित्र पाहून सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. लोंढे आघाडीकडे कि महायुतीकडे असा प्रश्न नेत्यांना पडला. महायुतीचा उमेदवार विजयी झाल्यावर याच लोंढे यांनी रिपाइं ज्या बाजूला असते त्या बाजूचा उमेदवार विजयी होतो’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. इतर विविध कारणांसह मोदीलाटेचा तडाखा आघाडीच्या उमेदवाराला बसला. आणि रिपाइंची ‘झाकली मूठ..’ तशीच राहिली. उमेदवार पराभूत झाल्यानंतर पराभवाची कारणे त्या त्या पक्षाकडून शोधली जातात. परंतु विजय मिळाल्यावर आणि तोही पावणेदोन लाखाच्या मताधिक्याने मिळालेला असेल तर कोणी किती मदत केली, कोणी काम केले नाही या मुद्यांचा फारसा विचार केला जात नाही. लोकसभा मतदारसंघाचा आवाका मोठा असल्याने काही त्रुटी सहजपणे खपून जातात. परंतु विधानसभा निवडणुकीत विजयासाठी एकेक मत महत्वपूर्ण असल्याने रिपाइंच्या भूमिकेकडे महायुतीतील इतर घटक पक्षांचे निश्चितच गांभीर्यपूर्वक लक्ष राहण्याची शक्यता आहे.