केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने व सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नगरोत्थान महाअभियानातून सोलापूर पालिका परिवहन उपक्रम विभागासाठी मंजूर झालेल्या दोनशे बसेस खरेदीच्या विषयास मंजुरी देण्यास परिवहन समितीतील सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी खोडा घातला. अभ्यासाला वेळ मिळाला नसल्याची सबब पुढे करून हा विषय मंजूर करण्यास सत्ताधा-यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे या विषयावर पुन्हा उद्या मंगळवारी परिवहन समितीची बैठक अपेक्षित आहे.
सोमवारी दुपारी पालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात परिवहन समितीची बैठक आयोजिली होती. समितीचे सभापती सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केंद्राकडून दोनशे बसेस मंजूर झाल्या असून त्याबाबतची माहिती सभेला सादर केली. दहा लाखांच्या आतील लोकसंख्येच्या शहरांसाठी केंद्र सरकारकडून सार्वजनिक परिवहन उपक्रमासाठी बसेस उपलब्ध होतात. त्यासाठी पालिका आयुक्त गुडेवार यांनी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून तो केंद्राकडे सादर केला होता. त्यावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अल्पावधीत केंद्राकडून दोनशे बसेस मंजूर झाल्या.
या योजनेनुसार ११२ कोटी ११ लाख खर्चाच्या २०० बसेस खरेदीसाठी ८५ कोटी ८० लाखांचे अनुदान मिळणार असून उर्वरित २६ कोटी ३२ लाखांची रक्कम परिवहन कर, स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) व अबकारी कर या पोटी खर्च होणार आहे. यात एलबीटीची दहा कोटींची रक्कम महापालिकेकडून परिवहन विभागाला प्राप्त होणार असून उर्वरित १६ कोटींचा कर माफ होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तर, दुसऱ्या बाजूला त्यासाठी हुडकोकडून १५ कोटींचे अर्थसाह्य़ मिळविण्यात येणार आहे. याशिवाय दोनशे बसेस खरेदी केल्यानंतर त्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी ६४ कोटी ८४ लाखांचा निधी लागणार आहे. यासंदर्भात व्हॉल्वो बसेस इंडिया व अशोक लेलॅन्ड कंपनीने निविदा भरल्या असून या निविदांमधील बसेसचे दर देशातील इतर महानगरांना पुरवठा केलेल्या बसेसचे दर एकच आहेत.
बसेस खरेदीसाठी निविदा मंजूर करून पुढील करार करण्याची मुदत १२ फेब्रुवारीपर्यंत असल्याने हा विषय मंजुरीसाठी परिवहन समितीकडे आला होता. परंतु अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याची सबब पुढे करीत सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी या विषयावरील सभा स्थगित करून उद्या मंगळवारी सभा बोलावण्याची मागणी केली. सभापती सुभाष चव्हाण यांनी सदस्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधा-यांनी विरोधकांची भूमिका वठविल्याचे दिसून आले. यासंदर्भात बोलताना सभापती चव्हाण यांनी सत्ताधारी सदस्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. अभ्यासासाठी वेळ मिळाला नाही, हे म्हणणे खरे नाही, तर यासंदर्भात पक्षाची दोनवेळा बैठक घेऊन त्यात हा विषय अभ्यासला गेला होता. परंतु अचानकपणे सभेत सत्ताधारी सदस्यांनी विसंगत भूमिका घेतली. याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांना पत्र देणार असल्याचे सभापती चव्हाण यांनी स्पष्ट केले.
शहराच्या विकासासाठी आयुक्त गुडेवार यांनी प्रयत्नपूर्वक दोनशे बसेसचा प्रस्ताव केंद्राकडून मंजूर करून आणला असताना त्यावर सकारात्मक प्रतिसाद देण्याऐवजी उलट, त्यास ‘खो’ घालण्याचा नतद्रष्टपणा सत्ताधारी सदस्यांनी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर, हा विषय परिवहन समितीने वेळेत मंजूर न केल्यास दोनशे बसेस मिळण्याचा मार्ग खडतर होण्याची भीती वर्तविली जात आहे.