संगणकयुगात अधिकाधिक माहिती संशोधनकार्यात उपयुक्त ठरते, मात्र ग्रामीण विद्यार्थी संगणक साक्षरतेपासून वंचित ठरत असल्याचे चित्र आहे. हा विद्यार्थी उपेक्षित राहू नये, यासाठी प्राध्यापकांनीच सजग राहण्याची गरज आहे, असे मत अमृतसरचे डॉ. एम.पी.सतिजा यांनी व्यक्त केले.
देवळीच्या एसएसएनजे महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे  संगणक युगातील माहिती साक्षरता, या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी या विषयातील तज्ज्ञ असलेले डॉ. सतिजा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास विद्यापीठाच्या ग्रंथालयशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. पी.एस.जी. कुमार, प्राचार्य डॉ. एस.आर.उपाध्याय, प्राचार्य अशोक पावडे व डॉ.किशोर अहेर यांची उपस्थिती होती.
विद्यापीठ पातळीवरील शिक्षणात संशोधनकार्य महत्वाचे ठरले आहे, असे नमूद करीत डॉ. कुमार म्हणाले की, शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागातील विद्यार्थ्यांचा त्यात समान वाटा अपेक्षित आहे. चर्चासत्राच्या प्रथम भागात डॉ. शालिनी लिहितकर, डॉ. पराग पराडकर, प्रा.श्रध्दा नायडू व दुसऱ्या भागात डॉ. मंगला हिरवाडे, डॉ. प्रतिभा ताकसांडे, डॉ.रामदास लिहितकर यांनी विचार मांडले.
दोन्ही सत्रात साठ शोधनिबंधांचे वाचन झाले. प्रा.एस.आर. कांबळे यांनी चर्चासत्राची भूमिका मांडली. प्राचार्य डॉ. एस.आर.उपाध्याय यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिलीप डबडे व डॉ. रमेश कोहाड यांनी केले. संतोष मोहदुरे यांनी आभार मानले.