दुकानातून अर्ज विक्री
आधार कार्ड काढण्यासाठी जो अर्ज लागतो तो आजूबाजूच्या झेरॉक्स दुकानातून २० ते ५० रुपयांपर्यंत विकण्यात येत आहे. विशेष म्हणजे आधार कार्डचे अर्ज विकणे कायद्याने गुन्हा असून ते खुलेआम विकले जात आहेत. याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. अशा अर्ज विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शासकीय योजनांच्या फायद्यासाठी आवश्यक असलेले आधार कार्ड काढण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. आधार कार्ड काढणाऱ्या किट्सची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांची प्रत्येक केंद्रावर गर्दी दिसत आहे. शासकीय योजनांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी आधार कार्ड प्रत्येक नागरिकांकडे असणे आवश्यक आहे. शासकीय योजना जशा नवीन रेशन कार्ड, बँक खाते उघडणे, संजय गांधी निराधार योजना अशा विविध योजनांसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड नोंदणी केंद्र कामठी पालिका परिसरात सुरू असून दररोज ६० ते ७० नागरिकांची या कार्डसाठी नोंदणी करण्यात येत आहे. परंतु ही संख्या फारच कमी आहे.
शहरात जवळपास २५० नागरिकांची नोंदणी करण्यात येत असून ही संख्या खूपच कमी आहे. जिल्ह्य़ात केंद्र सरकारची ‘मनी ट्रान्सफर योजना’ १ एप्रिलपासून राबविण्यात येत असल्यामुळे बँकेत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड नसल्याने बँकेने खाते उघडण्यासाठी नकार दिल्याने आधार कार्ड नोंदणी केंद्रावर गर्दी उसळली आहे. तसेच अनेक ग्रामीण भागात आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू झालेले नाहीत. जिल्हा परिषदचे सदस्य विनोद पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष रमेश चिकटे यांनी ग्रामीण भागात आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. आधार नोंदणी केंद्रातून ज्या पावत्या देण्यात येतात त्या निकृष्ट दर्जाच्या दिसून येत असल्याने त्याचा विनाकारण त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.