परभणी शहर महापालिकेच्या विविध समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपा या तीन पक्षांमध्ये जागावाटपाचे गणित जुळल्यानंतर या निवडी बिनविरोध झाल्या.
महापालिकेच्या विविध समित्यांच्या सात समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडीसाठी बी. रघुनाथ सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
सभापती-उपसभापतिसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आमने-सामने उमेदवारीअर्ज दाखल केले होते. शिवसेनेकडून एकही अर्ज आला नाही.
रविवारी रात्री राष्ट्रवादी व काँग्रेस गटनेत्यांत बैठक झाली. बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले. काँग्रेस-राष्ट्रवादीतील वाटाघाटीनुसार दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज मार्ग घेतले.
नवे पदाधिकारी असे : महिला व बालकल्याण समिती तिरुमला खिल्लारे (भाजप) व रेखा कानडे (राष्ट्रवादी काँग्रेस), स्थापत्य समिती – श्याम खोबे (काँग्रेस) व शिवाजी भरोसे (काँग्रेस), वैद्यकीय सहायक व आरोग्य समिती – गुलमीरखाँ कलंदर खाँ (अपक्ष) व वनमाला देशमुख (काँग्रेस), विधी समिती – सचिन कांबळे (राष्ट्रवादी) व विजया कनले (काँग्रेस), शहर सुधारणा समिती – मेहबूबखान नजीरखान व आशाबाई वायवळ, माध्यमिक-पूर्व माध्यमिक व तांत्रिक समिती – बाळासाहेब बुलबुले (राष्ट्रवादी) व राजर्षी जावळे (काँग्रेस), गलिच्छ वस्ती निर्मूलन, घरबांधणी व समाजकल्याण समिती – अनिता सोनकांबळे (राष्ट्रवादी) व आशाबाई वायवळ (राष्ट्रवादी). बैठकीस आयुक्त सुधीर शंभरकर उपस्थित होते.
राष्ट्रवादी ७, काँग्रेस ५, भाजप व अपक्ष प्रत्येकी १ सदस्यास संधी मिळाली.