स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा आणि साहित्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारे तीन दिवसांचे २६ वे सावरकर साहित्य संमेलन २४ ते २६ जानेवारी २०१४ या कालावधीत बडोदा येथे होणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ’ आणि ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकर गोखले आणि प्रतिष्ठानचे जनसंपर्क अधिकारी उत्तम पवार यांनी यासंदर्भात सांगितले की, बडोदा येथील वीर सावरकर स्मृती केंद्र आणि मराठी वाङ्मय परिषद यांचा या आयोजनात महत्त्वाचा सहभाग आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर हे संमेलनाचे अध्यक्ष तर खासदार बाळकृष्ण शुक्ल हे स्वागताध्यक्ष आहेत. तीन दिवसांच्या या संमेलनात एकूण १३ सत्रे होणार असून या सत्रांमध्ये प्रा. वीणा देव, दादूमिया, प्रा. अरुणा ढेरे आणि अन्य वक्ते सहभागी होणार आहेत. ‘सावरकर यांचा राष्ट्रवाद’ ही मुख्य संकल्पना घेऊन संमेलनातील कार्यक्रम आणि सत्रांची आखणी करण्यात आली आहे.
सावरकर यांच्या विचारांची कार्यवाही समाजाने केली तरच त्यांना अभिप्रेत असलेल्या अखंड, विज्ञाननिष्ठ आणि बलसंपन्न भारताची निर्मिती होणार आहे. ‘सावरकर विचार’ दुर्लक्षिले तर देशाचे पुन्हा विघटन होण्याचा धोका सध्याच्या अराजकसदृश्य परिस्थितीत दिसत आहे. हे टाळण्यासाठी सावरकर विचारांचा मोठय़ा प्रमाणात प्रसार करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही गोखले यांनी सांगितले. मराठीसह अन्य भाषांमध्ये प्रकाशित झालेले सावरकर यांचे साहित्य आणि सावरकरविषयक अन्य पुस्तके, सीडी या संमेलनात मांडण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
संमेलनात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी सावरकप्रेमी आणि अन्य मंडळींनी शंकर गोखले (०२२-२५६३१२२६), अनिल कानिटकर (०९२२७२८३५०५), सुरेश डांगे (०९८७९०४२६०१) या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.