थत्ते हौद व त्याच्या जलवाहिनीला राष्ट्रीय स्मारक घोषित करावयाचे असल्यास या नहरच्या भोवताली राहणाऱ्या २५ हजार कुटुंबीयांचे नुकसान होणार नाही याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संसदेत केली.
शहरातील बेगमपुरा भागात थत्ते हौद असून त्याला ६ ते ७ किलोमीटर लांबीची जलवाहिनी आहे. या जलवाहिनीचा व्यास १२ ते १८ इंच आहे. २० फूट खोलीवर असणाऱ्या या नहरसह थत्ते हौद संरक्षित घोषित करण्याची तयारी भारतीय पुरातत्त्व विभागाने केली आहे.
ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाली तर त्या परिसरातील १०० मीटरपेक्षा अधिक परिघाभोवती असणारी बांधकामे काढावी लागतील, अशी भीती आहे. या अनुषंगाने खासदार खैरे यांनी आवाज उठवला होता. थत्ते हौद व नहर संरक्षित घोषित केली जाणार की नाही, याविषयी माहिती अधिकाराच्या माध्यमातूनही माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही वास्तू संरक्षित नाही अथवा त्या अनुषंगाने अधिसूचनाही काढण्यात आली नसल्याचे कळविण्यात आले. मात्र, त्याच वेळी ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून परिसरातील २५ हजारांहून अधिक नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे यातून समन्वयाने मार्ग काढावा, अशी विनंती खासदार खैरे यांनी केली.