सध्याच्या तरुणाईला सेल्फीजची प्रचंड आवड निर्माण झाली आहे. जिथे जातील तिथे सेल्फीज काढून तो अपलोड करण्यात सर्वच तरुणाई आघाडीवर असते. लवकरच एखादा मुलगा चक्क वर्गात बसलाय आणि त्याने त्याचा सेल्फी काढून तो अपलोड केलाय असे चित्र दिसले, तर आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही. कारण आता लवकरच सेल्फीज आणि क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करून महाविद्यालयांमध्ये हजेरी घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
देशातील तरुणाई ज्याप्रमाणे तंत्रज्ञानाशी जोडली जात आहे. त्याच प्रमाणात त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी तंत्रमय होऊ लागल्या आहेत. देशातील अनेक महाविद्यालये विद्यापीठे तंत्रमय होऊ लागली आहेत. सध्या हजेरीपासून अनेक गोष्टी तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने होऊ लागल्या आहेत. याचेच पुढचे पाऊल म्हणून भविष्यात आता सेल्फीजने हजेरी घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये पार पडलेल्या ‘इंटरनेट २०२५ : इम्पॅक्ट ऑन रिसर्च अँड हायर एज्युकेशन’ या चर्चासत्रादरम्यान पिलानी येथील बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कुलगुरू डॉ. बिजेंद्र नाथ जैन यांनी हे भाकीत वर्तविले. स्मार्ट उपकरण आणि ऑटोमेटड तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने मोठय़ा वर्गामध्ये हजेरी घेणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा चेहरा एकदा क्लाऊड तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने सव्र्हरवर साठवून ठेवला की त्यानंतर ‘फेस रेकनायझेशन’ या तंत्रज्ञानाचा वापर करून रोज हजेरी घेतली जाऊ शकते. यामुळे हजेरी घेण्याचा वेळ वाचू शकतो इतकेच नव्हे, तर विद्यार्थी प्रत्यक्ष आला आहे की नाही हेही समजू शकते, असेही जैन यांनी स्पष्ट केले. पीपल सॉफ्टवेअरचा वापर करून आपण बहुसंकुल महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये हाय डेफिनेशन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही करता येऊ शकते असेही ते म्हणाले. जैन यांच्या या विचारांवर परिसंवादात सकारात्मक विचारमंथनही करण्यात आले.