जिल्ह्य़ातील संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावली असताना शिवसेनेनेही कंबर कसली असून नवी मुंबईत गेली पाच महिने रिक्त असलेले जिल्हाप्रमुख पद भरण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. ठाणे जिल्हाप्रमुख व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पद भरण्याचे अधिकार देण्यात आले असून त्यांनी सुचविलेल्या नावावर मातोश्री शिक्कामोर्तब करणार आहे. यासाठी पाच उमेदवार स्पर्धेत आहेत.
नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यावर एका तरुणीने बलात्कराची तक्रार पोलीस ठाण्यात केली. त्यामुळे या तक्रारीचा फटका पक्षाला निवडणुकीत बसेल याबद्दल मातोश्रीला सतर्क करण्यात आल्याने चौगुले यांना मातोश्रीच्या आदेशाने जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करून चौगुले यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. त्यात चौगुले यांच्यावरील आरोपामुळे त्यांनी उभे केलेल्या उमेदवारांना फटका बसेल हा पक्षाचा अंदाज फोल ठरला.
चौगुले यांनी स्वत:च्या नात्यागोत्यातील सहा उमेदवारांना निवडून आणले. याशिवाय त्यांचे समर्थक म्हणून १५ नगरसेवकांची फौज घेऊन ते वावरत आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याशिवाय दुसरा पर्याय पक्षाकडे शिल्लक नव्हता. त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यानंतर रिक्त असलेल्या जिल्हाप्रमुख पदासाठी आता व्यूहरचना सुरू झाली आहे.
मढवी, पाटील,  मोरे, गायखे, भगत चर्चेत
जिल्हाप्रमुख पदाच्या स्पर्धेत शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीला रामराम ठोकून सेनेत आलेले व स्वत:च्या ताकदीवर पत्नी व मुलाची जागा निवडून आणणारे एम. के. मढवी यांचे नाव  आहे. मढवी यांचे शिंदे यांच्याबरोबर सध्या जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. यानंतर कोपरखैरणे येथील चार वेळा पालिका निवडणुकीत विजयी मोहर लावणारे चाणाक्ष नगरसेवक शिवराम पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असून उपनेते विजय नाहटा त्यांच्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. वाशीतील पडेल नगरसेवक आणि बेलापूर विधानसभेचे दावेदार माजी नगरसेवक विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख पदाचे बाशिंग गेली अनेक वर्षे गुृडघ्याला बांधून तयार असलेले सानपाडा येथील उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, सिडकोचे माजी संचालक आणि काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भगवा खांद्यावर घेतलेले नामदेव भगत असे पाच उमेदवार या पदासाठी इच्छुक आहेत. प्रत्येकाने आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्ष मजबूत करण्यासाठी अजातशत्रू व मितभाषी जिल्हाप्रमुखाच्या प्रतीक्षेत येथील शिवसैनिक आहेत.