मुंबई विद्यापीठाला कल्याण येथे उपकेंद्र सुरू करण्यासाठी सात एकर जागा देऊनही गेल्या सात वर्षांत विद्यापीठाने या जागेवर एका विटेचेही बांधकाम केले नाही. विद्यापीठाला या जागेवर काही बांधकाम करायची इच्छा नसेल तर ही जागा परत घेऊ, असा इशारा कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने दिला आहे.
कल्याण, डोंबिवली, शहापूर, मुरबाड, भिवंडी, वाडा परिसरात महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबई विद्यापीठाचे कल्याण येथे उपकेंद्र सुरू व्हावे म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेने मुंबई विद्यापीठाला सात वर्षांपूर्वी सात एकर जमीन नाममात्र दराने दिली आहे. ही जमीन मिळताच विद्यापीठाने या जमिनीवर तात्काळ उपकेंद्र सुरू करण्याचे आश्वासन महापालिका पदाधिकाऱ्यांना दिले होते. सात वर्षे उलटली तरी विद्यापीठ उपकेंद्राचे बांधकाम सुरू करीत नाही. या जागेवर अतिक्रमण होण्याची शक्यता असल्याने शिवसेनेचे कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
१५ ऑगस्टपर्यंत विद्यापीठाने उपकेंद्राच्या जागेवर बांधकाम सुरू केले नाहीतर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. विद्यापीठाला दिलेली जमीन महासभेत ठराव करून महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाला सांगण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांनी उपकेंद्राची जमीन अकृषिक करण्याची नस्ती गेल्या काही महिन्यांपासून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अडकून पडली आहे. विद्यापीठाला बांधकाम सुरू करता येत नाही. ही नस्ती मंजूर होऊन विद्यापीठाला लवकर मिळाली तर १५ ऑगस्टपर्यंत उपकेंद्राचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.