शिवरायांच्या प्रशासन नीतीचा राज्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा. रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांचे धोरण अंगीकारायला हवे, असे मत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी व्यक्त  केले.
तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय इतिहास चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार नरेंद्र बोरगावकर होते. नगराध्यक्षा अर्चना गंगणे, कुलस्वामिनी सूतगिरणीचे अध्यक्ष अशोक मगर, नगरसेविका अ‍ॅड. मंजूषा मगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. दीपा साबळे, प्राचार्य डॉ. जे. एस. मोहिते, उपप्राचार्य डॉ. संजय कोरेकर, संयोजक डॉ. सतीश कदम यांची उपस्थिती होती. तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी संगणकीकृत इतिहास संशोधन केंद्र स्थापन करण्याची गरज आहे. अत्याधुनिक साधन सामुग्रीचा उपयोग संशोधनाच्या कामासाठी झाल्यास वेळेत बचत होऊन माहिती अद्ययावत राहते, असे पाटील यांनी सांगितले.
बोरगावकर यांनी, तुळजापूरच्या इतिहासाची सविस्तर माहिती दिली. इतिहासाची नवी रचना होण्यासाठी अशा त्याच्या अभ्यासाची गरज आहे. समाजाची बौद्धिकभूक भागविण्यासाठी नवनवीन विषयांचे संशोधन करावे. इतिहासाला नव्या आयामात समोर आणावे, असेही त्यांनी सांगितले. इतिहास मंडळाच्या अध्यक्षा साबळे यांनी, मराठय़ांचा इतिहास महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून, यात चुकीचे संदर्भ असल्याने खऱ्या इतिहासावर अन्याय झाला असल्याचे नमूद केले. प्राचार्य डॉ. मोहिते यांनी प्रास्ताविक केले.