सत्ताधारी मनसेवर दुटप्पीपणाचा आरोप
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या प्रश्नावर मनसे दुटप्पी भूमिका घेत असल्याची तोफ डागतानाच या स्मारकासाठी गंगापूर रस्त्यावरील इतिहास संग्रहालयाची जागा तातडीने उपलब्ध करावी, अशी मागणी करत शिवसेनेने सत्ताधाऱ्यांविरोधात असहकार आंदोलन छेडण्याचे सूतोवाच केले आहे. या अनुषंगाने सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी इतिहास संग्रहालयाच्या आवारात शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा स्थानापन्न केली. मनसेने स्मारकासाठी ही जागा उपलब्ध न केल्यास आगामी सर्वसाधारण सभेचे कामकाज चालू दिले जाणार नसल्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या विषयात मनसे व महापौर सोईसोईचे राजकारण करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. स्मारकासाठी जागा निश्चित करण्याच्या प्रलंबित मुद्दय़ावर शिवसैनिकांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेत त्याकरिता गंगापूर रस्त्यावरील इतिहास संग्रहालयाची जागा योग्य असल्याचा दावा केला. जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, माजी उपमहापौर अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे, देवानंद बिरारी, हेमंत गोडसे, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, नगरसेवक विलास शिंदे, सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक सोमवारी सकाळी गंगापूर रस्त्यावरील संग्रहालयाच्या परिसरात येऊन धडकले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा शिवसैनिकांनी या जागेवर स्थानापन्न केली. ही जागा शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी योग्य असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. या वेळी मनसेच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडण्यात आले.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक नाशिक येथे उभारण्याच्या विषयाला सर्वपक्षीय गटनेत्यांनी एकमताने मंजुरी दिली होती. त्यानंतर पालिकेच्या अंदाजपत्रकात स्मारकासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली. स्मारकासाठी जागा निश्चित करण्याच्या प्रक्रियेत महापौरांनी दिरंगाई केली. वास्तविक, संपूर्ण राज्यात नाशिकमध्ये सर्वप्रथम शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारून मनसेला श्रेय घेता आले असते. परंतु, मनसेकडून या विषयात सोईसोईने दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला.
मुंबईतील मुक्त महामार्गाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याची मागणी मनसेने केली असून दुसरीकडे नाशिकमध्ये स्मारकासाठी जागा उपलब्ध करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. शिवसेनाप्रमुखांच्या नियोजित स्मारकात कलादालन, बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट मांडणारे प्रदर्शन, प्रभावी वक्ते घडविणारी कार्यशाळा या पद्धतीने रचना होणे अभिप्रेत आहे. इतिहास संग्रहालयास केवळ एक ते दीड एकर जागा लागणार असून उर्वरित पाच एकर जागा या ठिकाणी उपलब्ध आहे. इतिहास संग्रहालय आणि शिवसेनाप्रमुखांचे स्मारक यांची योग्य पद्धतीने सांगड घालता येईल, असे शिवसैनिकांकडून सांगण्यात आले. ही जागा शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी उपलब्ध करावी आणि स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
महापौरांनी त्याबाबत जाहीर घोषणा न केल्यास सत्ताधाऱ्यांविरोधात असहकार आंदोलन छेडण्यात येईल, असेही बोरस्ते यांनी म्हटले आहे.